महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वाटप 

बलराज पवार
Wednesday, 9 September 2020

सांगली-  कोरोनाच्या काळात जीव धोक्‍यात घालून काम करताना मृत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज दहा लाखाचे सानुग्रह अनुदानाचे वाटप महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

सांगली-  कोरोनाच्या काळात जीव धोक्‍यात घालून काम करताना मृत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज दहा लाखाचे सानुग्रह अनुदानाचे वाटप महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

महापालिका सेवेत असताना स्वच्छता निरीक्षक सुधीर कांबळे, वरिष्ठ लिपिक परशुराम मुळे, क्रीडाधिकारी सुशीलकुमार माळी, आस्थापना विभागाचे मोहन आकिवाटे आणि पुंडलिक करसे या पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखाचे सानुग्रह अनुदान महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपमहापौर आनंद देवमाने, स्थायी सभापती संदीप आवटी, भाजपचे नेते शेखर इनामदार, गटनेते युवराज बावडेकर उपस्थित होते. 

नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले, कोरोनाने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून 50 लाखाचा निधी मिळवून द्यावा. त्यांच्या वारसांना शैक्षणिक गुणवत्तेनुसार कामावर घ्यावे. तसेच कोरोनाच्या संकटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे. कुपवाडचे नगरसेवक प्रकाश ढंग म्हणाले, कुपवाडला 50 बेडचे ऑक्‍सिजनची सुविधा असलेले कोविड केअर सेंटर सुरु करावे. पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सोय करावी. परराज्यातील व परजिल्ह्यातील मृतदेह तिकडेच अंत्यसंस्कारासाठी पाठवावेत. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये बेडची सोय करावी अशी मागणी केली. 

निरंजन आवटी म्हणाले, कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ठेका द्यावा. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांवर ताण येणार नाही. ऍड. स्वाती शिंदे म्हणाल्या, आदीसागरसारखे कुपवाड आणि मिरजेला कोविड केअर सेंटर सुरु करावे. 
आयुक्त कापडणीस म्हणाले, प्रत्येक कर्मचाऱ्याला 50 लाखांचा विमा आहे. त्याचबरोबर कोरोनाचे उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दीड लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्चाचा परतावा देण्याबाबत चर्चा सुरु आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आदीसागरमध्ये 20 बेड ठेवले जातील. 
यावेळी संतोष पाटील, गजानन मगदूम, भारती दिगडे, सविता मदने, सोनाली सागरे आदी उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of sanugrah grants to the heirs of deceased employees of the corporation