जिल्हा बॅंकेला 91 कोटी 18 लाखाचा नफा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सांगली-दुष्काळ, कर्ज वसुलीतील अडथळे, महापूर, कर्जमाफीची योजना अशा परिस्थितीतही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आर्थिक वर्षात 91 कोटी 18 लाख रूपये नफा मिळवला. आपत्तीमुळे कमी संधी असतानाही बॅंकेला चांगला नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सांगली-दुष्काळ, कर्ज वसुलीतील अडथळे, महापूर, कर्जमाफीची योजना अशा परिस्थितीतही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आर्थिक वर्षात 91 कोटी 18 लाख रूपये नफा मिळवला. आपत्तीमुळे कमी संधी असतानाही बॅंकेला चांगला नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""बॅंकेच्या इतिहासात आर्थिक वर्ष अडचणीचे ठरले. सुरवातीला दुष्काळामुळे कर्जवसुली थांबली. महापूरात वसुलीला स्थगिती मिळाली. कर्जमाफीच्या योजनेमुळे बॅंकेला यंत्रणा राबवावी लागली. आपत्तीमुळे बॅंकेला व्यवसाय करण्याची संधी फारच कमी मिळाली. बॅंकेने आर्थिक वर्षात 10 हजार कोटीहून अधिक रकमेचा व्यवसाय केला. बॅंकेचे भाग भांडवल 143 कोटी 22 लाख रूपये आहे. निधी 440 कोटी 25 लाख आहे. ठेवी 5 हजार 800 कोटी 82 लाख इतक्‍या आहेत. बाहेरील कर्ज 678 कोटी 33 लाख तर गुंतवणूक 2 हजार 358 कोटी 29 लाख इतकी आहे. 4 हजार 214 कोटी कर्ज वाटप केले. खेळते भांडवल 7 हजार 448 कोटी 28 लाख रूपये आहे. तर आर्थिक वर्षात 91 कोटी 18 लाख रूपये नफा मिळाला.'' 

ते पुढे म्हणाले, ""बॅंकेचा ढोबळ एनपीए 11.91 टक्के असून निव्वळ एनपीए 8.11 टक्के आहे. सध्या 503 कोटी रूपये एनपीए आहे. आर्थिक वर्षात कर्ज वाटपाचे प्रमाण कमी होते. ते वाढले असते तर सीडी रेशो वाढून नफा वाढला असता. गत वर्षात साखर कारखान्यांना 2400 कोटी रूपये कर्ज दिले होते. यंदा कारखान्यांनी जादा कर्जाची मागणी केली नाही. कारखान्यांना 1800 कोटी कर्ज दिले. तसेच ठेवीवरील व्याजापोटी 52 कोटी रूपये जादा द्यावे लागले. त्याचा परिणाम म्हणून बॅंकेला गतवर्षीपेक्षा नफा कमी झाला. तरीही बॅंक सुस्थितीत आहे. "सिक्‍युरिटायझेशन ऍक्‍ट' नुसार ताब्यात घेतलेल्या संस्था चालवण्याचा किंवा विक्री करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. आगामी वर्षात 125 ते 150 कोटी नफ्याचे उद्दीष्ट राहील.'' 
जिल्हा बॅंकेचे संचालक खासदार संजय पाटील, बॅंकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, सरव्यवस्थापक बी.एम. रामदुर्ग आदी यावेळी उपस्थित होते. 
 

बॅंक राज्यात आघाडीवर- 
अनेक अडचणी असताना देखील बॅंकेने 91 कोटी रूपये नफा मिळवला आहे. राज्यातील जिल्हा बॅंकांमध्ये सांगलीची बॅंक प्रथम चार क्रमांकात असेल. "कोरोना' चा फटका बॅंकेला बसला आहे. वसुलीवर त्याचा परिणाम झाला. अन्यथा गतवर्षीच्या 105 कोटी नफ्यापेक्षा अधिक नफा झाला असता असे अध्यक्ष श्री. पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The District Bank has a profit of 91 crore 18 lakhs