
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते फोडाफोडी सुरू झाली आहे. यावेळी विशेष म्हणजे ही सुरवात शिवसेना आणि राष्ट्रवादीने केली आहे.
तासगाव (जि. सांगली ) : उठा उठा दिवाळी आली ...! अशी एक जाहिरात प्रसिद्ध आहे, तशी सुरवात तासगाव तालुक्यात सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते फोडाफोडी सुरू झाली आहे. यावेळी विशेष म्हणजे ही सुरवात शिवसेना आणि राष्ट्रवादीने केली आहे. भाजपाचा मोठा गट शिवसेनेत गेला आहे.
तालुक्यातील 68 पैकी 39 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचे मैदान सुरू झाले आहे. बरोबर निवडणुकीचा मुहूर्त साधून कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू असते. मग ज्या पक्षात एखादा पुढारी जातो त्यापक्षाची ताकद वाढली असे घेणारा पक्ष म्हणतो आणि ज्या पक्षातून जातो त्या पक्षाला नेहमीप्रमाणे त्याच्या जाण्याने काही फरक पडणार नसतो.
सध्या तालुक्यात 39 गावांत निवडणूक ज्वर चढला आहे. गावोगावी या पक्षातून त्या पक्षात या गटातून त्या गटात कधी उघड तर कधी गुपचूप प्रवेश सुरू आहेत. तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटून भाजप अथवा संजय पाटील गटात जाणारी संख्या अधिक असे किंवा याची सुरवात या गटाकडून होत असे.
मात्र या निवडणुकीत भाजपामधून एक मोठा गट फुटून जाण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरवात शिवसेनेने केली आहे. पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही तालुक्याच्या पूर्व भागातील भाजपचे आजी- माजी पदाधिकारी प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. शिवाय एका मोठ्या गावातील पदाधिकाऱ्याने निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली शस्त्रे खाली ठेवली आहेत.
आता डाव झाला म्हटल्यावर प्रतिडाव होणारच ! नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये नाराज गट तयार आहेच. त्यापैकी काहीजण भाजपच्या गळाला लागले आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज माघार घेण्यापूर्वी नाराजांची नाराजी काढण्याची मोठी कसरत पक्ष नेत्यांना करावी लागणार असे चित्र दिसत आहे.
संपादन : युवराज यादव