एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच...तीन महिन्याचे थकीत वेतन जमा : सण उचलही मिळाली  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST.jpg

सांगली-  आर्थिक अडचणीमुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार की नाही? अशी साशंकता असतानाच कामगारांच्या प्रश्‍नांकडे वेळीच लक्ष दिले गेले. त्यामुळे तीन दिवसापूर्वी एक महिन्याचे थकीत वेतन आणि आज उर्वरीत दोन महिन्यांचे वेतन कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तसेच सण उचल देखील जमा झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच ठरणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच...तीन महिन्याचे थकीत वेतन जमा : सण उचलही मिळाली 

सांगली-  आर्थिक अडचणीमुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार की नाही? अशी साशंकता असतानाच कामगारांच्या प्रश्‍नांकडे वेळीच लक्ष दिले गेले. त्यामुळे तीन दिवसापूर्वी एक महिन्याचे थकीत वेतन आणि आज उर्वरीत दोन महिन्यांचे वेतन कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तसेच सण उचल देखील जमा झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच ठरणार आहे. 

कोरोनाच्या संकटात एसटी चे चाक बरेच दिवस बंद असल्यामुळे मोठे नुकसान झाले. नुकसान भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूक सुरू केली. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर सुरवातीला निम्म्या क्षमतेने एसटी धावू लागली. त्यानंतर सध्या पूर्ण क्षमतेने एसटी धावत आहे. परंतू प्रवासी संख्या अद्यापही म्हणावी तशी नसल्यामुळे फेऱ्यांची संख्या मर्यादीत आहे. दिवाळीमुळे मात्र 11 ते 22 नोव्हेंबरअखेर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडीमध्ये कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन थकीत राहिले. 

दिवाळी तोंडावर आली तरी तीन महिन्याचे थकीत वेतन आणि सण उचल मिळाली नसल्यामुळे कर्मचारी चिंतेत होते. कामगारांनी निवेदने देऊन आंदोलन सुरू केले. 9 रोजी थकीत वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा करतानाच उर्वरीत दोन महिन्याचे वेतन आणि सण उचल दिवाळीपूर्वी देण्याचे परिवहन मंत्री यांनी जाहीर केले. त्यानंतर आज सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तसेच सण उचलची मागणी करणाऱ्यांना देखील दहा हजार रूपये खात्यावर जमा करण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर तीन महिन्याचे वेतन एकदम जमा झाल्यामुळे कामगार आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. थोडा उशिराने का होईना थकीत वेतन आणि सण उचल मिळाल्यामुळे दिवाळी गोडच होणार निश्‍चित झाले. 
 

""एसटी कामगार संघटनेने थकीत वेतनासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारले होते. तत्पूर्वी निवेदने देऊन पाठपुरावा केला होता. या सर्वाची दखल घेऊन थकीत वेतन व सण उचल जमा करण्यात आली.'' 
-अशोक खोत (विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना) 
 

loading image
go to top