शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक करू नका : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

खरीप हंगामासाठी आवश्‍यक खते, बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. त्यांची अडवणूक, तसेच फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, जादा दराने विक्री होणार नाही. यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला.

सांगली : खरीप हंगामासाठी आवश्‍यक खते, बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. त्यांची अडवणूक, तसेच फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, जादा दराने विक्री होणार नाही. यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन केल्याचे कृषी विभागामार्फत यावेळी सांगण्यात आले.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज एनआयसी कनेक्‍टिव्हीटीद्वारे खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. बैठकीसाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात खरिपासाठी तीन लाख 66 हजार हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये तृणधान्याचे एक लाख 61 हजार 300 हेक्‍टर क्षेत्र आहे. कडधान्याचे 41 हजार 500 हेक्‍टर, तर तेलबीयांसाठी 93 हजार 100 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी 52 हजार 853 क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यामधील महाबीज व एनएससीकडून 21 हजार 141 क्विंटलचा तर अन्य खासगी कंपन्यांकडून 31 हजार 711 क्विंटल बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
गतवर्षी अतिवृष्टी, महापूर व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाधित झाल्याने महाबीजकडे 7 हजार 584 क्विंटलची वाढीव मागणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना स्वत:कडील सोयाबीन बियाणे वापरावयाचे आहेत, त्यांच्यासाठी गावस्तरावर उगवण क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण चाचणी घेतल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. 

खरीप हंगाम 2020-21 साठी गुणनियंत्रण नियोजन केले असून, जिल्ह्यात 11 भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत सर्व विक्री केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. 

शेतकरी अपघात विम्याच्या क्‍लेमबाबत नाराजी 
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे क्‍लेम दोन-तीन वर्षे प्रलंबित राहिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सदरची बाब अत्यंत चुकीची असून, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित गावच्या ग्रामसेवक व कृषी पर्यवेक्षकांनी संबंधितांच्या कुटुंबाकडून आवश्‍यक कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करून घ्यावी. शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूचे क्‍लेम विमा कंपन्यांकडून विहीत मुदतीत संबंधित कुटुंबाला मिळवून द्यावे. यामध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. 

ट्रान्स्फॉर्मर तातडीने दुरूस्त करा 
अनेक ठिकाणी दुरुस्तीअभावी ट्रान्स्फॉर्मर बंद असल्याची तक्रार असल्यावरून पालकमंत्री जयंत पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीने कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरची तत्काळ दुरुस्ती करावी. प्रलंबित कृषी पंपांच्या जोडण्या तत्काळ द्याव्यात, अशा सूचना केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do not cheat farmers : jayant patil