रस्त्यांची कामे तातडीने करा, अन्यथा.. इस्लामपुरात राष्ट्रवादीचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

रस्त्यांची कामे तातडीने करा, अन्यथा.. इस्लामपुरात राष्ट्रवादीचा इशारा

इस्लामपूर : शहरातील रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात. दोन दिवसात कामे सुरू न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने काम पूर्ण करू, असा इशारा आज नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय कोरे, शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, माजी सभापती बशीर मुल्ला प्रमुख उपस्थित होते

संजय कोरे म्हणाले, " राष्ट्रवादीच्या सतरा नगरसेवकांनी मिळून मुख्याधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठीचे निवेदन दिले आहे. जे रस्ते मंजूर आहेत; परंतु तांत्रिक अडचणींमुळे थांबली होती, अशा रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. भुयारी गटर अपूर्णतेमुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मंत्री जयंत पाटील यांच्याकडे अनेकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार खास बाब म्हणून हा निधी वापरण्यासाठीची अट शासनाकडून शिथिल करून घेतली आहे. एका प्रभागात चालू असलेले रस्त्याचे काम थांबवले हे दुर्दैवी आहे."

हेही वाचा: नाशिक : पोलिस अधीक्षकाची बदली थांबली! न्यायालयाने फटकारले

शहाजी पाटील म्हणाले, "जयंत पाटील यांनी एकही रुपया निधी दिलेला नाही, असे विधान करणे म्हणजे बालिशपणा आहे. शासनाच्या योजनेतून रस्ते कामांसाठी मंजूर झालेला निधी भुयारी गटारचे काम अपूर्ण राहिल्यामुळे खर्च न करण्याचा शासनाचा आदेश होता; मात्र जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ती अट शिथिल करून आणली आहे. नगराध्यक्ष शहरातून त्यांना विधानसभेला मतदान कमी पडल्याच्या रागातून अजूनही सुडाचे राजकारण करत आहेत. एकदा खुदाई केली की पुन्हा रस्ते करण्यासाठी निधी मिळणार नाही, असे पूर्वी परिपत्रकात असले तरी आता तसे होईलच असे नाही. शिवाय उकरल्या जाणाऱ्या रस्त्याचे पॅचवर्क करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. भुयारी गटर पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आहे. चोवीस बाय सात योजना त्यांनी गुंडाळून टाकली. रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यांनी आडकाठी आणू नये." खंडेराव जाधव म्हणाले, "भुयारी गटरचे काम आधी सुरू करा, तोपर्यंत दुसरी चर्चा न करण्याची भूमिका चुकीची आहे.

हेही वाचा: 38 हजार विद्यार्थी नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत

गटारीचे काम महत्त्वाचे आहेच; परंतु विषयपत्रिकेतील अन्य विषयही तितकेच महत्त्वाचे होते. दुसऱ्या जिल्ह्यात नगरपालिकेचा स्वतंत्र जीआर झाल्याची खोटी माहिती नगराध्यक्षांनी सभेत दिली. असा कोणताही जीआर झाला नव्हता. तसे झाले असल्यास त्यांनी जाहीर करावे. दहा तास चालणाऱ्या सभेत पाच तासांचे यांचे भाषण ऐकून घ्यावे लागते. त्यात शहराचे हीत नसते. शहराच्या विकासावर सभागृहात चर्चा होत नाही. व्यक्तीद्वेषातून कामकाज करण्यासाठी नागरिकांनी आपल्याला निवडून दिलेले नाही. मूळ विषय बाजूला ठेवून विषयपत्रिकेत नसलेल्या विषयांवर चर्चा होते, हे कोणत्या कायद्यात आणि अधिकारात चालते हे त्यांनी सांगावे. पब्लिसीटी स्टंट करण्यासाठी मिटिंगचा वापर होतो. यांचा विकासाचा कसलाही अजेंडा नाही. गेल्या पाच वर्षात काही कामे झालेले नाहीत. पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापन विस्कटले आहे. स्वच्छतेवर लक्ष नाही. कंत्राटदारांना ब्लॅकमेल केले जाते. त्यांना दमदाटी, शिवीगाळ केली जाते. रस्त्यांसाठी निधी आलेला असताना ती कामे बंद पाडण्याचे कारणच काय?"

loading image
go to top