तुम्हाला माहित्येय का... सोलापुरात आज दिवसभरात किती गुन्हे घडले...?

तुम्हाला माहित्येय का... सोलापुरात आज दिवसभरात किती गुन्हे घडले...?

दागिन्यांची चोरी : संशयावरून बसमधील प्रवाशांची केली तपासणी. 

सोलापूर : बस प्रवासादरम्यान महिलेकडील एक लाख 35 हजार रुपये किमतीचे दोन गंठण चोरीला गेले. ही घटना 31 डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात घडली. या घटनेनंतर संशयावरून बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली, मात्र दागिने मिळाले नाहीत. 

कलावती चैतन्य बिद्री (वय 50, रा. राममंदिर, जनता वसाहत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. कलावती बिद्री व त्यांची मुलगी या दोघी गुड्डापूर येथील देवीच्या दर्शनाला जाण्याकरिता पुणे येथून सोलापुरात आल्या होत्या. इंद्रायणी एक्‍स्प्रेसने सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दीड वाजता त्या दोघी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात गुड्डापूरकडे जाण्यास विजयपूर बसमध्ये बसल्या. विजयपूरला जाण्यास तिकीट काढण्याकरिता बिद्री यांनी बॅग तपासली. तेव्हा त्यांना बॅगेत ठेवलेले एक लाख 35 हजार किमतीचे दोन सोन्याचे गंठण चोरट्यांनी चोरल्याचे लक्षात आले. या घटनेंतर बिद्री यांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली, मात्र त्यांना दागिने मिळाले नाहीत. या प्रकरणात सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

पाच लाख आण नाहीतर त्रास देऊ 
पैशांची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दगडू कृष्णा माने, नितीन दगडू माने, प्रवीण दगडू माने, भामाबाई दगडू माने, पती सचिन दगडू माने (सर्व रा. नागू नारायणवाडी, डोंगगाव रोड, सुभद्राबाई मंगल कार्यालय, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पौर्णिमा सचिन माने (वय 35, रा. नागू नारायणवाडी, डोणगाव रोड, सुभद्राबाई मंगल कार्यालयासमोर. सध्या- जुनी मिल चाळ, सुपर मार्केट, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 10 फेब्रुवारी 2019 रोजी घडली आहे. आरोपींनी विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास देऊन पौर्णिमा यांच्या माहेरच्या लोकांना शिवीगाळ केली. माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला असा त्रास देत राहीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

कारखाना, घर फोडून चोरी 
जुना विडी घरकुल परिसरातील पिट्टानगर येथे कारखाना व घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने, दोन गॅस सिलिंडर असा एकूण एक लाख 82 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ओमप्रकाश लक्ष्मीनारायण आडम (वय 43) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी आडम यांच्या कारखान्याचा व राहत्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दागिने, रोकड आणि गॅस सिलिंडरच्या दोन टाक्‍या चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 
-- 
जागेच्या कारणावरून दोन गटांत वाद 
सोलापूर, ता. 5 : जागेच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. घरात घुसून जागेच्या कारणावरून वाद घालून मारहाण केल्याप्रकरणी मुकुंद भुतडा, आनंद भुतडा (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात नंदा नंदलाल जोशी (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे. तर मुकुंद किसनदास भुतडा (वय 70, रा. तुळजापूर वेस, माहेश्‍वरी सांस्कृतिक भवनजवळ, भवानी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू जोशी, कट्टीमनी आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. जागेच्या कारणावरून मारहाण करून गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली तसेच पोलिसात तक्रार दिल्यास तुला बघून घेतो अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे भुतडा यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. 

सोन्यासाठी विवाहितेचा छळ 
विवाहितेकडून सोन्याची मागणी करून छळ केला. याप्रकरणी पती स्वप्नील नीलेश पवार, सासू स्नेहल नीलेश पवार, सासरा नीलेश नागूराम पवार (रा. शांती सोसायटी, कोपरगाव, डोंबिवली, पश्‍चिम मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री स्वप्नील पवार (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 10 डिसेंबर 2017 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत मुंबईत घडली. या प्रकरणात भाग्यश्री स्वप्नील पवार (वय 27, रा. शिवगंगा मंदिराजवळ भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पैशाच्या कारणावरून मारहाण 
व्याजाच्या पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. युवराज विजय फटफटवाले (वय 20, रा. स्लॅटर हाउस बापूजीनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. देविदास मन्सावाले, किरण शिवसिंगवाले, रवी मन्सावाले, सीताराम मन्सावाले अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आकाश चौधरी यांच्या घरात घुसून व्याजाच्या पैशाच्या कारणावरून युवराज, आकाश आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. खिशातील 700 रुपये काढून घेतले. घरासमोर थांबलेल्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले. तुम्हा सगळ्यांना ठार मारतो अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

पोलिसात खबर दिल्याने तलवारीने हल्ला 
पोलिसात खबर दिल्याच्या कारणावरून तलवारीने वार करून जखमी केले. याप्रकरणी रजाक गफूर शेख, रमजान गफूर शेख (थोबडेवस्ती, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ईश्‍वर नागनाथ गायकवाड (वय 35, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) यांनी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास थोबडेवस्ती परिसरात घडली. ईश्‍वर गायकवाड व त्यांचे भावजी अंबादास जाधव हे दोघे ऑफिसमध्ये प्लॉट संदर्भात चर्चा करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात तलवार होती. शिवीगाळ करून तू पोलिसात आमची खबर देतो का, तुला आत्ताच खलास करतो, तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून जीव घेण्याच्या उद्देशाने तलवारीने मानेवर वार केला. वार हुकवून गायकवाड हे तिथून पळून जाऊ लागले. तेव्हा आरोपींनी दगड उचलून फेकून मारला. दुचाकीचे आणि अन्य साहित्याचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com