रुग्णाला तपासण्यावरून डॉक्‍टरांना धक्‍काबुक्‍की; कुठे घडला प्रकार

विजय लोहार
Sunday, 13 September 2020

नेर्ले (जि. सांगली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात "तुम्ही रुग्णाला पाहिलेच नाही', असे म्हणत डॉक्‍टरांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. ही घटना शुक्रवारी (ता. 11) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

नेर्ले (जि. सांगली) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात "तुम्ही रुग्णाला पाहिलेच नाही', असे म्हणत डॉक्‍टरांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. ही घटना शुक्रवारी (ता. 11) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी डॉ. सागर शिंदे यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली. विजयकुमार विलास पाटील, कुलदीप अशोक पाटील व मनीष संभाजी महाडिक (सर्व रा. नेर्ले) यांच्यावर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कासेगाव पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, नेर्लेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री साडेअकराच्या सुमारास कुलदीप पाटील व मनीष महाडिक हे जखमी विजयकुमार पाटील यास घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. त्यांनी डॉक्‍टर कुठे आहेत, याबाबत विचारणा केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे हे दवाखान्यातील त्यांच्या निवासस्थानातून काही वेळातच दवाखान्यात दाखल झाले.

यावेळी विजयकुमार हा जखमी होता. त्याच्यावर त्यांनी प्राथमिक उपचार केले. परंतु विजयकुमार पाटील याला जास्त दुखापत असल्याने त्याला डॉ. सागर शिंदे यांनी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र शिफारस पत्र न घेता, "तुम्ही आमच्या रुग्णाला पाहिलेच नाही' असे म्हणत डॉ. शिंदे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. वॉर्डाच्या दरवाजावर लाथाही मारल्या. 

या प्रकरणी संशयितांवर लोकसेवकास कर्तव्य बजावताना रोखणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शिविगाळ करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या महामारीत जीव धोक्‍यात घालून सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना धक्काबुक्की झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor beaten for not examining an injured patient