ग्रेटच : गटारीत पडलेल्या गाढवाला बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरच उतरले गटारीत...

स्वप्नील पवार
Tuesday, 28 July 2020

मानवतेतून जखमी गाढवावर केले उपचार...

देवराष्ट्रे (सांगली) - वेळ साडेचारची. देवराष्ट्रेतील चौकात एक चारचाकी गाडी अचानक येऊन थांबली. गाडीतून एक युवक उतरला. तो गटारीजवळ जाऊन थांबला. परत गाडीजवळ आला. अंगातील शर्ट काढला. गटारीत उतरला. तोवर चौकातील लोक त्याचे कृत्य पाहून जवळ आले. तो युवक गटारीत पडलेल्या गाढवाला उचलून बाहेर काढत होता. तो थेट गटारीत उतरला होता. ते दृश्‍य पाहून बघे गहिवरले. त्याला मदत करू लागले. 
गाढवाला बाहेर काढल्यावर त्याच्या जखमेवर युवकाने उपचार केले.

या युवकाचे नाव सागर रघुनाथ पाटील. कराड तालुक्‍यातील काले गावचे. सागर बहिणीला भेटण्यास ते रामापूर (ता. कडेगाव) येथे देवराष्ट्रेमार्गे निघाले होते. देवराष्ट्रेतील गटारीत गाढव पडल्याचे दिसले. त्यांनी गाडी जागीच थांबवली. एकटेच गटारीतून गाढवास बाहेर काढू लागले. एक तरुण शर्ट काढून गटारीत उतरला, हे पाहून ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी पाहिले आणि गहिवरून गेले. त्यांनीही गाढवाला बाहेर काढायला मदत केली.

गाढवाला बाहेर काढल्यावर मेडिकलमधून औषध आणून जखमी गाढवावर उपचार केले. सागर शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. काले येथे कार्यरत आहेत.

मुक्‍या प्राण्यावर नागरिकांनी प्रेम करावे. मी माझे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमीत सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो.
- सागर पाटील
काले (ता. कराड, जि. सांगली.)

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor got out of the gutter to get the donkey out of the gutter