
संगमनेर ः तब्बल 22 दिवसांपासून माझ्या कुटुंबापासून दूर आहे. कुटुंबीयांची आठवण येते आहे. मात्र, या जीवघेण्या कोरोनाच्या हल्ल्यातून परमेश्वराने मला सुखरूप बाहेर काढले, याचे समाधान आहे. त्याने मला पुढील आयुष्य जगण्याची संधी दिलीय.
कोरोनाच्या दोन्ही चाचण्या "निगेटिव्ह' आल्यानंतर कोरोनाबाधेतून सुटका झालेल्या तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील युवकाने "सकाळ'शी बोलताना भावनांना वाट करून दिली. कष्ट हेच भांडवल असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील या युवकाला ध्यानीमनी नसताना, पाहुण्याकडून कोरोनाचा "वानवळा' मिळाला.
"मी स्वतःच 30 मार्च रोजी निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेलो. त्यानंतर मी स्वतःला पूर्णपणे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. ज्या परमेश्वराने मला आजार दिला, तोच यातून बाहेर काढील याची मनोमन खात्री होती. त्यामुळे विचलित झालो नाही. नगर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पथकाने खूप चांगली ट्रीटमेंट दिली. जेवणाचीही व्यवस्थित सोय होती.
या दरम्यान एकांतवास भोगावा लागला. परमेश्वराची आराधना, जुन्या आठवणींत मन रमवणे सुरू होते. माझे कुटुंबीय व परिसरातील इतरांना "होम क्वारंटाईन' केल्याने झालेल्या त्रासाची कल्पना येत होती. माझी काल मुक्तता झाली. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संगमनेरातील एका रुग्णालयात 14 दिवसांसाठी ठेवून घेतलंय. खूप चांगली देखभाल हे पथक करीत आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा, परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा धडा यातून मिळाला.
"कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं!' चाचणीसाठी दिलेल्या 14 दिवसांपेक्षा पुढचे आरोग्यमय आयुष्य निश्चित उज्ज्वल आहे, हे ध्यानात ठेवून वैद्यकीय पथकाला साथ द्या. कोरोनाची व्यर्थ भीती बाळगू नका... लढा द्या.. यश तुमचंच आहे.
"कोरोना हा बरा होणारा आजार!'
मी स्वतः डॉक्टर असल्याने कोरोनाच्या लक्षणांबाबत मला माहिती होती. मात्र, मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतरचा माझा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यावर मला धक्काच बसला, अशी आठवण कोरोनामुक्त झालेल्या नगरमधील डॉक्टरांनी सांगितली.
ते म्हणाले, ""औषधोपचारानंतर बरा होईपर्यंत मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कोरोनाचे रुग्ण बरे होतात. जागतिक आरोग्य संघटना व शासनाने दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मीडियावरील माहितीची सत्यता नागरिकांनी पडताळून पाहिली पाहिजे. सोशल डिस्टन्सचे नियमपालन करावे.'' रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेसा आहार, पुरेशी झोप, प्राणायाम व योगासने करावीत. रक्तदाब, मधुमेह, दमा, कॉलेस्टेरॉल आदी समस्या असलेल्या रुग्णांनी विशेष दक्षता घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.