जनता कर्फ्यू नको, 14 दिवसांचा लॉकडाऊन करा... सांगलीत यांनी केली मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

जनता कर्फ्यू परिणामकारक ठरत नाही. लोक ऐकत नाहीत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात 14 दिवसांचा लॉकडाऊनच जाहीर करा. त्यासाठी केंद्राचे सारे निकष पूर्ण करून घ्या, अशी विनंती महापालिका क्षेत्रातील व्यापारी एकता असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.

सांगली ः जनता कर्फ्यू परिणामकारक ठरत नाही. लोक ऐकत नाहीत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात 14 दिवसांचा लॉकडाऊनच जाहीर करा. त्यासाठी केंद्राचे सारे निकष पूर्ण करून घ्या, अशी विनंती महापालिका क्षेत्रातील व्यापारी एकता असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. शहरात बंद होणार असेल तर त्याला व्यापारी साथ देतील, मात्र कडकडीत बंद ठेवून कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी आवश्‍यक ते सर्व नियम कडकपणेच पाळले जावेत, अशी स्पष्ट मागणी संघटनेने केली. 

अध्यक्ष समीर शहा यांनी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही निवेदन पाठवून दिले. त्यात म्हटले आहे, की सांगली जिल्ह्यात आणि प्रामुख्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृत्यूदर काळजीत टाकणारा आहे. सर्वात मोठा जीवाचा धोका आज व्यापारी समाजास होत आहे. आजची इथली स्थिती पुणे, मुंबईसारखी झाली आहे. जर अशीच स्थिती राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे, यात कोणतीही शंका नाही. या स्थितीत प्रशासनातर्फे कडक 14 दिवसांचा लॉक डाऊन व्हावा. सोबत संचारबंदी आणि जिल्हा बंदी करावी. 

पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करून लवकर निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला आश्‍वासन दिले आहे. लॉकडाऊनला केंद्राची परवानगी लागते, पण अशा स्थितीत केंद्र शासन परवानगी नाकारू शकत नाही, असं मत संघटनेने व्यक्त केले. ,शिवाय जनता कर्फ्यू हा इथं प्रभावी ठरणार नाही, त्यामुळं शासनाने लॉक डाऊन करावा अशी मागणी केली. समीर शहा, सुरेश पटेल, सोनेश बाफना, धिरेन शहा उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dont announce janata curfew, lock down for 14 days ...