कोरोना रुग्णांना ताटकळत ठेवू नका...पालकमंत्री जयंत पाटील

बलराज पवार
Monday, 10 August 2020

सांगली-  खासगी रूग्णालयांनी कोरोना रुग्णांना ताटकळत ठेवू नये. बेड्‌स उपलब्ध असताना रुग्ण सेवा नाकारु नये. रूग्ण घाबरलेल्या मनस्थितीत असतात त्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करावे. संकटाच्या या वेळेत सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज खासगी डॉक्‍टरांचे कान टोचले. 

सांगली-  खासगी रूग्णालयांनी कोरोना रुग्णांना ताटकळत ठेवू नये. बेड्‌स उपलब्ध असताना रुग्ण सेवा नाकारु नये. रूग्ण घाबरलेल्या मनस्थितीत असतात त्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करावे. संकटाच्या या वेळेत सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज खासगी डॉक्‍टरांचे कान टोचले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, खासगी कोविड रुग्णालयांचे डॉक्‍टर उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,""कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता खासगी रूग्णालये अधिग्रहित करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खासगी रूग्णालयांनी आवश्‍यक ते सर्व सहकार्य द्यावे. सर्वांनी मिळून कोरोना बाधितांवर उपचार करूया व मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी प्रयत्न करूया. खासगी रूग्णालयांच्या कार्यपध्दतीत सुसुत्रता यावी यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या बेड मॅनेजमेंट सिस्टीमला प्रतिसाद देवून सर्वांनी ती वेळेत अद्ययावत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. 

खासगी रुग्णालयांनी जबाबदारी झटकू नये 
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी खासगी रुग्णालये जबाबदारी झटकत असल्याबद्दल इशारा दिला. ते म्हणाले,""खासगी रूग्णालये जबाबदारी झटकून रूग्णांना मोठ्या हॉस्पीटलच्या दिशेने पाठवितात. तेथे खाटा उपलब्ध नसल्यास अडचणीचा प्रश्न येतो. हे टाळण्यासाठी रूग्णाला न झटकता गांभीर्य ओळखून प्राधान्याने उपचार सुरू करावेत.'' 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी, गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी काही बेड्‌स राखीव ठेवावेत. रूग्णांना तातडीने उपचार द्यावेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचीबध्द होण्यासाठी खासगी रूग्णालयांनी स्वत:हून क्षमतावृध्दी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आवश्‍यक मदत रूग्णालयांना प्रशासनामार्फत करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले. 

कोविडसाठी 11 कोटींचा निधी 
जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्‍यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't keep corona patients waiting .Guardian Minister Jayant Patil