केंद्राकडे बोट दाखवू नका, आधी मदत करा : चंद्रकांतदादांचा चिमटा...ग्रामीण भागात मोठे नुकसान 

बलराज पवार
Sunday, 18 October 2020

सांगली- अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी राज्य शासनाने तातडीने मदत करावी नंतर केंद्राकडून मदत मागावी, असा चिमटा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला. 

सांगली- अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी राज्य शासनाने तातडीने मदत करावी नंतर केंद्राकडून मदत मागावी, असा चिमटा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला. 

सांगलीत पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, आमची सत्ता असताना सरसकट कर्जमाफी, महापुराच्या काळात दहा हजार कोटींची मदत केली होती. नंतर केंद्राकडून मदत मागितली. त्यावेळी सहा हजार 800 कोटी रुपये मिळाले. काही नुकसान सोसावे लागले. पण आधी आम्ही खर्च केले. मात्र सध्याचे सरकार कोरोना महामारी नंतर निसर्गवादळ अशी कारणे सांगून वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवते. त्यापेक्षा राज्य शासनाने आधी कागदावर आपल्याला नेमकी कशी मदत पाहिजे, किती मदत पाहिजे त्याचे नियोजन करावे. नंतर केंद्राकडे निधी मागावा. कोरोना महामारीच्या काळात जे दिले ते केंद्राने दिले आहे. पीपीई किट, व्हेंटिलेटर आदी सर्व मदत केंद्राने केली आहे असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले. 
"ईडी'चा संबंध नाही 

जलयुक्त शिवार घोटाळ्यातील चौकशीचा निर्णय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीकडून चौकशी होण्याच्या वृत्ताबद्दल बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार आणि ईडीचा काही संबंध नाही. कॅगने दिलेल्या अहवालावरून जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांनी चौकशी करावी. त्यात जे समोर येईल त्यावर कारवाई करावी. 

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, आम्ही मागे लागल्यामुळे ते घराबाहेर पडत आहेत. घराबाहेर पडून बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केल्याशिवाय भरपाई देऊ शकत नाही अशी मागणी केली. त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't point to the center, help first: Chandrakantdada