लवकरच शहरभर धावणार इ रिक्षा... कुठे?

अजित झळके 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

सांगली, मिरजेतील रस्त्यांवर आता डझनभर ई-रिक्षा धावताना दिसताहेत. पुढच्या काही वर्षांत धूर सोडत, प्रचंड वेगाने कट मारणाऱ्या रिक्षांना ओव्हरटेक करून ई-रिक्षा रस्ते व्यापून टाकतील. पर्यावरण संवर्धन आणि बचत या दोन्ही पातळीवर या रिक्षा प्रभावशाली ठरत आहेत. त्याला परमीटची गरज नसल्याने त्यात कुणाची मक्तेदारीही निर्माण होणार नाही. 

नागपूरसारख्या मोठ्या शहरात ई-रिक्षाची संकल्पना अतिशय वेगाने वाढली आणि आता ती नागपूरच्या प्रवासी वाहतुकीचा कणा बनताना दिसत आहे. म्हैसूरसारख्या प्रचंड लोकप्रिय पर्यटन केंद्रावरही या रिक्षांचा प्रभाव आहे.

अनेक पर्यटन स्थळांनी प्रवाशांच्या वाहतुकीसाठी त्याची सोय केली आहे. आता काही रिक्षा सांगली-मिरज रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. आज संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी आहे. ती हळूहळू वाढेल. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागही प्रयत्न करतोय. प्रचार आणि प्रसारासाठी काम सुरू आहे. केवळ रोजगार निर्मिती म्हणून नव्हे तर सांगलीच्या फुप्फुसासाठी आणि प्रवासी वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी ई-रिक्षा प्रभावी ठरणार आहे. 

सांगली, मिरजेतील बहुतांशी रस्ते समतल आहेत. चढ फारसे नाहीत. जे आहेत त्यांची चढत ई-रिक्षासाठी फारशी अडचणीची नाही. शहरातील रस्त्यांची गुणवत्ताही आता वाढली आहे. किमान मुख्य रस्त्यांबाबत भविष्यातही गुणवत्तेचा आग्रह राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सांगली आणि मिरज, कुपवाड या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर जरी ई-रिक्षा धावली तरी ती खूपच परिणामकारक ठरणार आहे. विशेष म्हणजे या रिक्षांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंद आवश्‍यक आहे, मात्र त्यासाठी परमीट लागणार नाही. त्यामुळे परमीटच्या जीवावर मक्तेदारी निर्माण होण्याचा विषय असणार नाही. 

बेरोजगारांना संधी 
केवळ सांगली, मिरजच नव्हे तर इस्लामपूर, विटा, तासगाव अशा शहरांतील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारा हा व्यवसाय बनणार आहे. या रिक्षाच्या क्षमतेबाबत काही शंका आहेत, मात्र त्याही आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीत या रिक्षा प्रभाव दाखवतील. 

तांत्रिक माहिती 
ई-रिक्षातून एकावेळी चालक अधिक तीन लोक आरामात प्रवास करू शकतात. सुमारे 500 किलोहून अधिक वजन एकावेळी वाहून नेण्याची या रिक्षांची क्षमता आहे. त्यांची बॅटरी 650 ते 1400 वॅटपर्यंतची असते. ती एकवेळ चार्ज केली की किमान 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास होऊ शकतो. एखाद्याने दोन बॅटरींचा आलटून-पालटून वापर करायचे ठरवले तर दिवसभर रिक्षा सातत्याने धावू शकेल. 

प्रदूषणापासून रक्षण करतील

ई-रिक्षाला नोंदणी आवश्‍यक असली तर परमीटची गरज नाही. त्यामुळे काही काळात सांगली ई-रिक्षांची संख्या नक्कीच वाढलेली दिसेल. त्यासाठी आम्ही प्रचार, प्रसार करतोय. सांगलीतील रस्ते समतल असल्याने येथे या रिक्षा यशस्वी होतील. प्रदूषणापासून रक्षणात या रिक्षा मोलाचे काम करतील. 

- विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dozens of e-rickshaws now running on the streets of Sangli, Miraj.