डॉ. आंबेडकर यांच्या विचाराने बदलली परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

बाबासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा; शिक्षण, साहित्य, समाजसेवेत ठरले "रोल मॉडेल'

कोल्हापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मंगळवारी (ता. 6) महापरिनिर्वाण दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून अनेकांनी प्रेरणा घेऊन ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश मिळविले. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शैक्षणिक, सामाजिक, महिला सबलीकरण, साहित्य अशा क्षेत्रांतून त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रातिनिधिक व्यक्तींनी त्यांच्या वाटचालीत, यशात त्यांना आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा कशी मिळाली, हे सांगितले.

शैक्षणिक विचारातून आत्मभान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. ते माझे "रोल मॉडेल' यासाठीच आहे, की शिक्षण घेतल्यानंतर आपण प्रतिकूल परिस्थिती बदलू शकतो. प्रतिकूल परिस्थिती बदलण्याचा विश्‍वास शिक्षणातून मिळतो, हे त्यांनी दाखवून दिले. आजपर्यंत माझा प्राध्यापक आणि पुढे पीएचडी होण्यापर्यंतचा प्रवास केवळ त्यांच्या शैक्षणिक विचाराने झपाटल्याने झाला. मला त्यातून आत्मभान आले. कर्मकांड, थोतांड यांना शिक्षणामुळेच विरोध करू शकलो. शिक्षणामुळेच जाती-पातीच्या पलीकडे प्रत्येक व्यक्तीचा माणूस म्हणून विचार करू शकलो.
प्रा. डॉ. विवेक खरे, नाशिक

महिलांवरील अत्याचाराबाबत जागृती
बाबासाहेबांचे स्त्री स्वातंत्र्यविषयक विचार, मूलभूत परिवर्तनवादी विचार खूप भावले. बाबासाहेबांचा लढा हिंदू कोड बिलाच्या कायदेशीर स्वरूपातून साकार करण्याचा होता. अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांना मुक्‍त करण्याची त्यांना संविधानाच्या माध्यमातून संधी मिळाली. स्त्रिला जागृत करून, तिला अधिक संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मी "हिंदू कोड बिल' यावर गीते लिहिली. महिलांवरील अत्याचाराबाबत जागृतीचा प्रयत्न केला. यासाठी "हिंदू कोड बिल' गीतांचा "सरणंग्‌' हा संग्रह काढला. त्यातील गीते श्रेया घोषाल यांनी गायली आहेत.
- राजेश ढाबरे, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च व प्रशिक्षण संस्था, पुणे

साहित्यातून मांडले दुःख
समाजातील उपेक्षित वर्गासाठी लिहिण्याची प्रेरणा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून मिळाली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जो विचार लागतो, तो विचार बाबासाहेबांच्या कार्यातून मिळाला. साहित्यातून तळागाळातल्या लोकांचे दुःख मांडण्याचा प्रयत्न साहित्यातून करायला हवा. आपले दुःख गोंजारत न बसता दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन दुसऱ्याचे दु:ख जगाच्या वेशीवर टांगण्याचा विचार बाबासाहेबांपासून मिळाला. आपल्यावर होणारे अत्याचार दूर करणे व दुःखितांचे दु:ख मांडण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर साहित्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
- योगीराज वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक

अधिकारापेक्षा समतेला महत्त्व
डॉ. आंबेडकर यांचा कोणतेही काम करताना दृढ निश्‍चय असायचा, तसेच त्यांनी कामात पारदर्शकता ठेवली. हाच विचार मनात रुजवून यश मिळविण्यासाठी प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार सोबत असतील, तर कुणाचीही मदत न घेता आयुष्यातील मोठे शिखर गाठता येते. जात, धर्म, वर्ग, पंथ यांच्याबाहेर पडून सर्वांना एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे या विचाराचे पालन केले. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य-समता-बंधुत्व ही त्रिसूत्री दिली. या विचारांवर एक शासकीय अधिकारी म्हणून काम करताना वर्ग एक ते चारपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लोकसेवक म्हणून काम करायला हवे, असे वाटते.
- डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सोलापूर

Web Title: Dr. Ambedkar Thought changed the situation