डाॅ. बाभूळकरांचे कार्यकर्ते म्हणाले, कोणत्याही पक्षातून लढा, पण निवडणूक लढवाच

डाॅ. बाभूळकरांचे कार्यकर्ते म्हणाले, कोणत्याही पक्षातून लढा, पण निवडणूक लढवाच

नेसरी - कार्यकर्ते आणि बाबा कुपेकर घराण्याचे नाते राजकारणापलीकडचे आहे. निवडणूक न लढविण्याची घोषणा करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा हेतू कदापिही नव्हता.  कार्यकर्ते अंतःकरणापासून बोलले. त्या भावनांचा आदर निश्‍चितच आहे. म्हणून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, याबाबत फेरविचार करण्यासाठी चार दिवसांची मुदत द्यावी, असे आवाहन डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी केले.

आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी स्वत:सह डॉ. नंदिनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु, त्यांची उमेदवारी कायम राहावी, यासाठी कार्यकर्ते दोन दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी येथील विठ्ठलदीप हॉलमध्ये आज मेळावा झाला. तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार अध्यक्षस्थानी होते. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बाभूळकर म्हणाल्या, ‘‘बाबा कुपेकर घराण्याला मिळालेल्या राजकीय यशामागे कार्यकर्त्यांचे प्रेम महत्त्वाचे आहे. मुळात निवडणूक न लढविण्यामागे दबाव कसलाच नव्हता. इतिहासात काही दबावाच्या गोष्टी घडल्या; पण त्याला भिक न घालता रिंगणात उतरलो. कुपेकर आणि बाभूळकर घराणे कष्टाने पुढे आले आहे. यामुळे ‘ईडी’ची भीती तर अजिबात नाही. काही कौटुंबिक कारणामुळे या निर्णयापर्यंत आपण आलो होतो. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखावा म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे ठरविले. बाबांच्या विचारांची ठेवण जपण्याची जाणीव सर्वांनाच आहे. तीन तालुक्‍यांत सर्वांत मोठी संघटना राष्ट्रवादीची आहे. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये निश्‍चित राष्ट्रवादी मजबूत झाली आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर कधीच करणार नाही. अखेरच्या श्‍वासापर्यंत कुपेकर कुटुंबीय या भावना जतन करेल. उमेदवारीसंदर्भात फेरविचार करण्यासाठी चार दिवसांची मुदत द्यावी. आमदार कुपेकर व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोणताही निर्णय झाल्यास त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहूया.‘‘

‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, महाबळेश्‍वर चौगुले, मसणू सुतार, उदयराव जोशी, बाबासाहेब पाटील, दीपकराव जाधव, गणेश फाटक, प्रकाश पाटील, भैरू खांडेकर, दशरथ कुपेकर, डॉ. नामदेव निट्टूरकर, नामदेव पाटील, विद्या पाटील, दत्तू विंझणेकर, तानाजी शेंडगे, रघुनाथ पाटील, ज्ञानप्रकाश रेडेकर, संभाजी पाटील, सरिता भोगण, रामलिंग पाटील, वसंत गवेकर, राजू होलम, सुभाष देसाई, विकास मोकाशी, जुवेद काझी, जब्बार मुल्लार, आप्पासाहेब पाटील, शंकर कांबळे, बबन देसाई, सिकंदर नाईक आदींची भाषणे झाली. जयसिंग चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. गडहिंग्लज, आजरा, चंदगडमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही पक्षातून लढा
मेळाव्यात, डॉ. बाभूळकर यांनीच निवडणूक लढवावी, असा सर्वच कार्यकर्त्यांचा सूर राहिला. अधूनमधून कार्यकर्त्यांनी ‘ताई, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. व्यासपीठावर डॉ. बाभूळकर यांचे पती डॉ. सुश्रूत यांनाही उद्देशून कार्यकर्त्यांनी डॉ. नंदिनी यांना निवडणूक लढण्यासाठी ‘एनओसी’ द्यावी, अशी विनंती करीत होते. विशेष म्हणजे, केवळ रामाप्पा करिगार व मसणू सुतार यांनीच थेटपणे राष्ट्रवादीतून लढण्याची सूचना केली. उर्वरित सर्वच जणांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी घ्या; पण निवडणूक लढवा, अशीच मते मांडली. 

कार्यकर्त्याला संधीचा विचार
डॉ. बाभूळकर म्हणाल्या, ‘‘निवडणूक न लढविण्याच्या घोषणेमागे कौटुंबिक कारण होतेच. परंतु, त्यापेक्षा पक्षातील एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार मनात घोळत होता. पक्षाची जबाबदारी घेण्यासाठी एखादा सामान्य कार्यकर्ता पुढे यावा, अशीच इच्छा घोषणा करताना कुपेकर घराण्याला होती. यामुळे आम्ही कार्यकर्त्यांचे हात सोडून जात आहोत, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.’’

मेळाव्यातील ठराव
या मेळाव्यात गणेश फाटक यांनी चार ठराव मांडले. चंदगडमधून डॉ. बाभूळकरांनी उमेदवारी ठेवावी, कोणत्याही पक्षातून लढण्यास कार्यकर्त्यांचा पाठिंबा, डॉ. बाभूळकरांना आमदार करण्याचा निश्‍चय असे ठराव कार्यकर्त्यांनी हात वर करून एकमुखाने मंजूर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com