दुष्काळी भागात फुलले ड्रॅगन फ्रुट; महिन्याभरात देशभरात फळे होणार दाखल

Dragon fruit blooming in drought-prone areas; Fruits will be sebt across the country within a month
Dragon fruit blooming in drought-prone areas; Fruits will be sebt across the country within a month

सांगली ः मॉन्सून दाखल होताच दुष्काळी तालुक्‍यांत ड्रॅगन फ्रुट(गुंजाली) ची टपोरी फुले लक्ष वेधून घेऊ लागलीत. तीन वर्षांत जिल्ह्यात सुमारे 200 एकर क्षेत्र लागवडीखाली आले. महिन्याभरात देशातील बाजारांत सांगलीची फळे दाखल होतील.

फेब्रुवारीपासूनच देशातील बाजारपेठांत ड्रॅगन फ्रुट यायला सुरवात होते. मात्र सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील हंगाम जूनपासून सुरू होतो. तो ऑक्‍टोबरपर्यंत असतो. फळाचे वैशिष्ट्य म्हणजे केरळात मॉन्सून दाखल झाला, की इकडे टपोऱ्या कळ्या दिसू लागतात. आठ दिवसांत दोन हातांच्या ओंजळीत सापडेल इतकी मोठी फुले दिसू लागतात. फुले पाहणेही आनंददायी असते. दुष्काळी तालुक्‍यांच्या बोडक्‍या माळांवर हिरवाईची दुलई चढण्याआधीच ही फुले अचानक प्रगटतात. निसर्गाचे हे रूप ही दुष्काळी तालुक्‍याची अलीकडची नवी ओळख झाली. हे येरळा प्रोजेक्‍टच्या प्रयत्नांमुळे. 

कमी पाणी, कमी देखभाल खर्चात येणारे पीक ही दुष्काळी तालुक्‍यांची गरज होती. द्राक्षाची गुंतवणूक आणि देखभाल खर्च मोठा. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला, तर शेतकरी उद्‌ध्वस्त होतो. यावर उपाय म्हणून "येरळा' ने ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. हे फळ याच भागाचे वाटावे म्हणून त्यांनी गुंजाली असे नामकरणही केले. रोपे वाटपापासून प्रशिक्षणापर्यंत सारे काही संस्थेने केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. तीन वर्षांत जिल्ह्यात या फळाची लागवड दोनशे एकरांवर पोहोचली. दीडशेंवर शेतकरी संस्थेच्या संपर्कात आहेत. सध्या फळे हैदराबाद, बंगळुरू, मुंबई या महानगरांच्या बाजारांत दाख होऊ लागलीत. सांगली मार्केट यार्डात गत हंगामात चारशे टन फळे आली होती. काही वर्षांत द्राक्षांप्रमाणेच या फळांच्या निर्यातीला सुरवात होईल, अशी आशा आहे. 

दुष्काळी भागासाठी आधार

गत हंगामात सरासरी प्रतिकिलो साठ ते ऐंशी रुपये दर मिळाला. एकरी दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. द्राक्षाच्या तुलनेत कमी गुंतवणूक-देखभाल खर्चाचे हे फळ दुष्काळी भागासाठी आधार ठरत आहे.
- मुंकुद वेळापूरकर, विश्‍वस्त, येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी 

चौफेर जीवनसत्वांचे फळ 

"क' जीवनसत्वाचे आगर म्हणजे हे ड्रॅगन फ्रुट फळ. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यात आहे. ते अनेक रोगांवर उपाय आहे. प्रतिकार शक्ती वाढीसाठी खूप उपयोग आहे. त्वचा विकारांसाठी उपयुक्त आहे. भरपूर फायबर असल्याने पचनासाठी उपयुक्त आहे. कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तातील साखर कमी राहते. बिटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदयविकारांवर लाभदायी आहे. अँटीऑक्‍सिडंट केसांसाठी लाभदायी, ते डेंगी रुग्णांच्या आहारात असावे, असा सल्ला डॉक्‍टर देतात. कुपोषित गर्भवतींसाठी होमोग्लोबिन वाढीसाठीही उपयुक्त ठरते. लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते, असा दावा केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com