भाजपच्या वागणुकीला कंटाळून ' हे ' चालले राष्ट्रवादीत ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सामान्य जनता आपल्याला साथ देईल. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जावे, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

कुडाळ : माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना भाजपने गळाला लावल्यामुळे गेली पाच वर्षे भाजपसाठी झटणाऱ्या दीपक पवार यांच्या कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला आहे. त्यातूनच साताऱ्यात आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार घेण्याचा जोरदार आग्रह त्यांच्याकडे केला. कार्यकर्त्यांच्या आग्रह व भाजपने दिलेल्या वागणुकीला कंटाळून दीपक पवारही राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. 22) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. हे राजकीय समीकरण झाल्यास सातारा विधानसभेसाठी शिवेंद्रसिंहराजे व दीपक पवार यांच्यात लढत होण्याची शक्‍यता दिसते. 

गेल्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंविरोधात सक्षम उमेदवाराची भाजपकडे वानवा होती. अशा परिस्थितीत दीपक पवार यांनी भाजपत प्रवेश केला. त्या वेळी मतदारसंघात भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. गेली पाच वर्षे त्यांनी पक्ष बांधणीकडे लक्ष दिले. सातारा नगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या. सत्ताधारी पक्षात असल्याने मतदारसंघातील विविध विकासकामांना निधी मिळवून दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना चांगली लढत दिली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत केलेली कामे व पक्ष बांधणीच्या जोरावर ते भाजपतून प्रबळ दावेदार ठरत होते; परंतु ऐन वेळी शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपत प्रवेश केल्याने पवार यांची राजकीय कोंडी झाली.

शिवेंद्रसिंहराजेंना पक्षात घेतल्यानंतरही त्यांनी पक्षात राहून उमेदवारीचा हक्क डावलला जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी बूथ प्रमुखांचा मेळावा घेतला. जावळीतील भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली; परंतु पाच वर्षे पक्षासाठी केलेल्या कामाची दखल वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतली गेली नाही. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुढे काय असा प्रश्‍न दीपक पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला होता. 

या पार्श्‍वभूमीवर आज त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात भाजपकडून झालेल्या अन्यायाबाबत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. राजकीय अस्तित्वाबरोबरच सर्वसामान्यांचे नेतृत्व, राजकारणातील स्थान टिकवण्यासाठी दीपक पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. संपूर्ण मतदारसंघामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यातून सामान्य जनता आपल्याला साथ देईल. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. भाजपकडून झालेला अन्याय व कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा विचार करून दीपक पवारही या निर्णयाप्रत येतील, असे जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून संपर्क साधण्याचे काम सुरू असून, सकारात्मक चर्चा झाल्यास शरद पवारांच्या रविवारच्या दौऱ्यात दीपक पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असेही कार्यकर्ते सांगत आहेत. 
 

सोशल मीडियावर वातावरण निर्मिती 
आजच्या बैठकीमध्ये सर्वच जवळच्या कार्यकर्त्यांकडून दीपक पवार यांना राष्ट्रवादीत जाण्याचा आग्रह धरला गेला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, असे दिसल्यावर काही उत्साही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गाण्यावर दीपक पवार यांच्या फोटोचे एडिटिंग करून क्‍लिप तयार केली. ही क्‍लिप संपूर्ण मतदारसंघात व्हायरल होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to behavior of the BJP leader wish to go in ncp