पुरस्थितीमुळे इंधनाचे टँकर मिरजेतच अडकले

संतोष भिसे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मिरज - पुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि कोकण भागात डिझेल-पेट्रोलचे टँकर पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न तेल कंपन्यांकडून सुरु आहेत. पुरामुळे रस्ते बंद झाल्याने मिरजेतील इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम डेपोसमोर टँकर खोळंबले आहेत.

मिरज - पुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि कोकण भागात डिझेल-पेट्रोलचे टँकर पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न तेल कंपन्यांकडून सुरु आहेत. पुरामुळे रस्ते बंद झाल्याने मिरजेतील इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम डेपोसमोर टँकर खोळंबले आहेत.

पूरग्रस्त भागात, विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाची टंचाई आहे. अनेक पेट्रोलपंप पाण्याखाली गेलेत तर उर्वरीत पंपांवरील साठा संपुष्टात आला आहे. प्रशासनाने काही पंप राखीव ठेवले असले तरी तेथे इंधनपुरवठा होऊ शकत नाही.

मिरजेतील डेपोतून या जिल्ह्यांना तेलाचा पुरवठा होतो. सुमारे आठवडाभरापासून तो ठप्प आहे. दोन्ही डेपोंमध्ये मुबलक तेलसाठा आहे. कोल्हापूरसह कोकण भागात टँकर पाठवण्यासाठी तेल कंपन्यांचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. किमान एक - दोन टँकर तरी जावेत यासाठी सर्व मार्गांची चाचपणी सुरु आहे. मिरजेतून विटा - कराड व तेथून महामार्गावरुन कोल्हापूरला पोहोचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महामार्गावर तीन - चार फूट पाणी असले तरी टँकर सोडण्याचा विचार आहे. तेल कंपन्यांचे गोवा विभागाचे अधिकारी सातत्याने पश्चिम महाराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. 
कोकणासाठी गोवा - मुंबई महामार्गावरुन टँकर पाठवले, पण ते देखील अडकून पडले आहेत.

मिरजेत रेल्वेने इंधन पुरवठा होतो, पण रस्ते बंद असल्याने बाहेर जाणारे टँकर थांबून आहेत. सध्या फक्त सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पुरवठा सुरु आहे. पूरग्रस्त भागात रस्ते खुले होताच तातडीने भरण्यासाठी 25 टक्के टँकर राखीव ठेवले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the Flood situation, the fuel tanker was stuck in Miraj