मजूरच नसल्याने तासगाव तालुक्‍यात द्राक्ष छाटण्या खोळंबल्या 

रवींद्र माने 
Saturday, 14 November 2020

एकाचवेळी सुरू झालेल्या द्राक्ष छाटण्या आणि बिहारी मजूर परतल्याने द्राक्ष बागांमध्ये मजुर मिळत नसल्याने चक्क छाटण्या आणि अन्य कामे लांबणीवर टाकावी लागत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे. अभूतपूर्व मजुरांची कमतरता निर्माण झाली आहे. 

तासगाव : एकाचवेळी सुरू झालेल्या द्राक्ष छाटण्या आणि बिहारी मजूर परतल्याने द्राक्ष बागांमध्ये मजुर मिळत नसल्याने चक्क छाटण्या आणि अन्य कामे लांबणीवर टाकावी लागत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे. अभूतपूर्व मजुरांची कमतरता निर्माण झाली आहे. 

सध्या द्राक्ष छाटण्या आणि द्राक्षबागेतील अन्य कामे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. पावसामुळे यावर्षी एकाच वेळी छाटण्या घ्याव्या लागल्या आहेत. कामे तर सुरू झाली मात्र मजूर शोधण्यासाठी आता द्राक्षबागायतदारांना धावपळ करावी लागत आहे. एकाच वेळी सर्वत्र कामे सुरू झाल्याने इतके मजूर आणायांचे कोठून ? हा प्रश्न सद्या शेतकऱ्यांना सतावतो आहे.

जादा क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडे बिहार, पश्‍चिम बंगाल मधील शेतमजूर वार्षीक मजुरीवर असतात मात्र त्यापैकी परराज्यातील मजूर लॉकडावून आणि निवडणूक यामुळे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक मजुरांवर जादा कामाचा ताण पडत आहे. स्थानिक मजुरांचे गट आहेत हे गट एकाच शेतकऱ्याचे वर्षभरातील सर्व बागेतील कामे घेत असतात. त्याचाही परिणाम मजूर न मिळण्यावर झाला आहे. 

मिळेल तेथून मजूर आणून काम करून घेणे द्राक्ष शेतकऱ्यांना भाग पडत आहे. परिणामी तासगाव तालुक्‍यातील मजूर मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यात जाताना दिसत आहेत. बागायतदारावर मजुरांना ने आन करण्याची सोय करतो पण आमच्या बागेत कामाला या असे म्हणावे लागण्याची वेळ आली आहे. ज्या भागात द्राक्षशेती जास्त आहे तिथे ही समस्या जास्त भेडसावत आहे. मजुरांची शोधाशोध हा नवा उपद्‌व्याप बागायतदारांच्या मागे लागला आहे. 

द्राक्षबागेत हवेत ट्रेंड शेतमजूर 
शिवाय द्राक्ष बागेत काम करण्यासाठी "ट्रेंड" शेतमजूर लागतात. द्राक्ष बागेतील कामे ही अतिशय काळजीपूर्वक करावी लागत असल्याने विशिष्ठ कामे करणाऱ्या शेत मजुरांसाठी बागेतील कामे खोळंबून रहात आहेत. छाटणी करणे, पेस्ट लावणे, वांझ फूट काढणे,डिपिंग थिनिंग अशी कामे करण्यासाठी मजुरीही जादा द्यावी लागत असते.शिवाय ही कामे एकाचवेळी आणि विशिष्ट वेळेत करावी लागत असल्याने मजुरांप्रमाणे बागायतदारांचीही ओढाताण होत आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of labor, grape pruning was carried out in Tasgaon taluka