esakal | जावली : लॉकडाऊनला कंटाळून इंजिनिअर तरूणाची मुंबईत आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suraj Surve

सुरज हा फोनवरून नेहमी घरच्याशी बोलत होता. तसेच स्वभावाने शांत व निरागस होता. गावाला सण उत्सव व कार्यक्रमाला यायचा. तसेच सर्वांशी आपुलकीने वागणे व हाक मारणे त्यामुळे डांगेरघर गावांतील तो अनेकांचा प्रिय व हुशार होता.

जावली : लॉकडाऊनला कंटाळून इंजिनिअर तरूणाची मुंबईत आत्महत्या

sakal_logo
By
विजय सपकाळ

मेढा ( ता. जावळी, जि. सातारा ) : लॉकडाउनमुळे नवीमुंबई येथे अडकलेल्या जावळी तालुक्यातील डांगरेघर गावच्या इंजिनिअर तरुणाने आई- वडीलांच्या आठवणीने व्याकूळ होऊन अखेर राहत्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात घडली आहे. त्यामुळे संपूर्ण जावळी तालुक्यात या घटनेची चर्चा असून या कोरोनामुळे काय काय बघाय मिळतयं कोणास ठाऊक अशी चर्चा सुरू झाली आहे.

 
सूरज सखाराम सुर्वे (वय 27) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सूरज हा लॉकडाउन लागू झाल्यापासून कोपरखैरण येथे एकटाच घरात राहत होता. त्याचे सर्व कुटुंबीय जावळी तालुक्यातील डांगरेघर येथे राहत होते. कुटुंबीय गावी असल्यामुळे सूरजला लॉकडाऊनमुळे गावी जाता आले नाही. तो इंजिनियर असून ऐरोलीतील एका कंपनीत नोकरीला होता. 

जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मूळगांव असून तो आपला मोठा भाऊ आणि वाहिनीसोबत राहायला होता. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दादा वहिनी
गावाला गेले. त्याचे आई वडील ही गावालाच असतात. त्यामुळे सर्वजण गावी तर तो एकटाच कोपरखैरण मध्ये अडकला होता. त्यामुळे त्याला नैराश्य व
 एकटेपणा जाणवत होता. आज सायंकाळी चारच्या दरम्यान कोपरखैरणच्या सेक्टर चार येथील राहत्या घरात त्याने आत्महत्या केल्याच्या अवस्थेत त्याचा
मृतदेह आढळून आला. 

लॉकडाऊन वाढतच गेल्याने तो घरी एकाकी पडला होता. त्यांच्या शेजारील त्याला जेवण देत होते. आज त्याला नेहमीप्रमाणे शेजारचे जेवण घेऊन गेले असता दरवाजा बंद होता. मात्र, त्याने दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळविण्यात आले. यावेळी दरवाजा तोडला असता आतमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.

त्याचे वयोवृध्द आई वडील गावांला शेती करतात. तर एक मोठा भाऊ कोपरखैराण येथे फोटोचा व्यवसाय आहे. सुरज हा फोनवरून नेहमी घरच्याशी बोलत होता. तसेच स्वभावाने शांत व निरागस होता. गावाला सण उत्सव व कार्यक्रमाला यायचा. तसेच सर्वांशी आपुलकीने वागणे व हाक मारणे त्यामुळे डांगेरघर गावांतील तो अनेकांचा प्रिय व हुशार होता. त्यामुळे पुर्ण गावांवरच  शोककळा पसरली आहे.

आत्महत्येपुर्वी त्याने लिहिली चिठ्ठी

त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. लाकडाऊनमुळे घरी एकटाच असल्याने घर खायला उठत आहे.   ज्यांची सतत आठवण येते, परंतु भेट होऊ शकत नाही. तर लॉकडाऊन किती वाढेल त्यांची ही खात्री नाही. यामुळेच आत्महत्या करत आहे. या घटनेची नोंद कोपरखैरण पोलिस ठाण्यात झाली असून या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.