सांगलीत पाणंद रस्त्यावरील चिखलामुळे शेतकऱ्यांची दमछाक 

विष्णू मोहिते 
Friday, 25 September 2020

पाणंद रस्ते हा विषय तसा सरकारने अजेड्यावर घेवून सोडवण्याची गरज आहे. बागायती क्षेत्रातच नव्हे तर आता जिरायती भागातही रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे.

सांगली : पाणंद रस्ते हा विषय तसा सरकारने अजेड्यावर घेवून सोडवण्याची गरज आहे. बागायती क्षेत्रातच नव्हे तर आता जिरायती भागातही रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे. गेल्या पाच वर्षात पाणंद रस्त्यांसाठी मिळणारा तोकडा निधीही यंदा कोरोना मुळे दुरापास्त झाला आहे. रब्बी हंगाम आणि द्राक्ष फळ छाटण्याच्या पार्श्‍वभूमिवर सध्या पाणंद रस्त्यावर गुडगाभर चिखल झालेला आहे. परिणामी खरीपाची काढणी, रब्बीची तयारी, द्राक्ष फळ छाटणीसाठी खतांची वाहतूक शेतकऱ्यांचीसाठी खर्चीक झालेली आहे. शेतकऱ्यांची आणखी आठ-दहा दिवस दमछाक होणार आहे. 

बागायती सह जिरायत क्षेत्रातही दळणवळण व विकासाच्या दृष्टीने पाणंद रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे; पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ज्या रस्त्यांना ओळखले जाते अशा पाणंद रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहे. शेजारील शेतकऱ्यांनी ते क्षेत्र पेरावू केलेले आहे. हे केवळ आता बागायती क्षेत्रात मर्यादीत नाही तर जिरायती क्षेत्रातही ही समस्या जाणवते आहे. पेरणी, खते, मशागतीसाठी शेजारी शेजाऱ्याला स्वतःच्या शेतातून जाण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. रस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी काढलेला माल मजुरांकरवी वाहतुक करुन 500 फुटापासून एक किलोमिटरपर्यंत पैसे खर्चुन बाहेर काढावा लागतो आहे. रब्बी हंगामाची तयारीबाबतही तशीच अवस्था आहे. सध्या द्राक्ष बागांची फळ छाटणी सुरु होत आहे. काळ्या बागायती पट्ट्यात रस्त्यावर चिखलामुळे खते वाहतुक करण्यासाठी एक-दोन किलोमिटरसाठी दुप्पट खर्च करायची वेळ आलेली आहे. 

मोहिम हाती घेण्याची गरज
पालक मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील पाणंद रस्ते दुरुस्तीचा अजेंडा ठेवला आहे. आघाडी सरकार आल्यानंतर तशी घोषणाही झाली. मात्र कोरोना महामारीमुळे या योजनेकडे सरकारसह प्रशासनाचेही दुर्लक्ष झालेले आहे. कोरोना संकट संपताच किमान "एक गाव एक पाणंद रस्ता,' मोहिम हाती घेण्याची गरज आहे. 

कवलापूर काळ्या पट्टयातील पाणंद रस्त्यावर पुन्हा मुरमीकरणाची गरज आहे. चार वर्षांत येथे सिंचन योजना झाल्या अन्‌ दोन नव्याने होणार आहेत. हे लक्षात घेऊन ग्रामस्थ तसेच लोकप्रतिनिधींनी पाणंद रस्त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. 
- महेशराव शिंदे, कवलापूर. 

दृष्टिक्षेप 
- जिल्ह्यातील महसुली गावे-730 
- ग्रामपंचायती संख्या- 699 
- एक गाव, एक पाणंद रस्ता - एकही नाही 
- अनेक पाणंद रस्त्यावर अतिक्रमण 
- गाडी रस्त्यांची अनेक प्रकरणे न्यायालयात 
- सरकारने एकाच वेळी पाणंद रस्ते मोहिम राबवण्याची गरज
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to mud on Panand road in Sangli, farmers are exhausted