जिल्हा परिषदेच्या खांदेपालट चर्चेला राष्ट्रवादीमुळे बळ; इच्छुकांचा वाढता दबाव

Due to NCP discussion & pressure building started in Zilla Parishad for changing ruling body
Due to NCP discussion & pressure building started in Zilla Parishad for changing ruling body

सांगली ः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महापालिका, जिल्हा परिषदेच्या सत्तेत पाडापाडीचे राजकारण करण्यात रस नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत खांदेपालट करण्याच्या मागणीला जोर चढला आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी भाजपच्या प्रमुख सदस्यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून इथल्या कारभाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना येथे लक्ष घालावे लागणार आहे. अध्यक्षपदासाठी आरगेतील कोरबू गट धडपडत असून, उपाध्यक्ष पदासाठी डी. के. पाटील यांच्यासाठी आग्रही भूमिका राहणार आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेना, विकास आघाडीला सोबत घेऊन सत्ता राखली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गटही सोबत आहे. पहिली पावणेतीन वर्षे संग्रामसिंह देशामुख यांच्या अध्यक्षतेखाली कारभार चालला. त्यावेळी सव्वा वर्षे झाल्यावर बंडाचे वारे सुटले होते. पदाधिकारी बदलाची मागणी झाली होती. ती टिकली नाही. तेव्हा तांत्रिक कारणाने अडीच वर्षांऐवजी पावणेतीन वर्षांपर्यंत पदाधिकाऱ्यांना मुदत मिळाली.

त्यानंतर प्राजक्ता कोरे अध्यक्ष, शिवाजी डोंगरे उपाध्यक्ष, तर सुनीता पवार, आशा पाटील, जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे सभापती झाले. त्यांना एक वर्ष पूर्ण होत असताना सरदार पाटील, अरुण बालटे यांनी पदाधिकारी बदलाची मागणी केली आहे. हे दोघेही सभापती पदासाठी इच्छुक आहेत. जि. प. मतदार संघाचे सतत बदलणारे आरक्षण पाहता "अभी नही तो कभी नही', ही त्यांची सहाजिक भावना आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. 

नवीन पदाधिकारी निवडताना राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेचा राज्यातली महाविकास आघाडी पटर्न राबवला जाईल का? त्यामुळे भाजपच्या हातून सत्ता जाईल का, अशी भीती सतत व्यक्त केली जाते. विद्यमान पदाधिकाऱ्यांसाठी ते सुरक्षा कवच आहे. त्यालाही आता छेद देणारी भूमिका राष्ट्रवादीनेच जाहीर करून खांदेपालट करण्यातील अडचण दूर करून टाकली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ""ज्यांना जनतेने संधी दिली आहे, त्यांनी टर्म पूर्ण करावी'', असे स्पष्ट करत महापालिका, जिल्हा परिषदेत सत्तेसाठी फोडाफोडी करणार नाही, असे सांगितले आहे.

निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना राष्ट्रवादी असला खेळ करणार नाही, हे भाजप नेतेही जाणून आहेत. भाजप इच्छुकांनी मुद्द्यावर बोट ठेवले आहे. आता पदाधिकारी बदलात धोका नाही, हे रेटून, सांगितले जात आहे. या बदलात मिरज तालुक्‍यातच पुन्हा अध्यक्षपद मिळणार असेल, तर आमदार सुरेश खाडे विरोध करणार नाहीत. उलटपक्षी प्राजक्ता कोरे अध्यक्षपदावरून दूर व्हावेत म्हणून खाडे समर्पक अधिक आग्रही आहेत. खासदार संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील गेल्यावेळी उपाध्यक्ष पदाला इच्छुक होते. यावेळी त्यांना संधी मिळणार असेल तर खासदार पाटील बदलास अनुकूल असतील. 

चंद्रकांतदादा काय करणार? 
जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा चेंडू अर्थातच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात असेल. ते काय निर्णय घेतात, सव्वा वर्षावर आलेल्या जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत काय धोरण राबवतात, हे पाहणे लक्षवेधी असेल. जिल्हा परिषदेतील भाजप अंतर्गत सुंदोपसुंदी पाहता, पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष असेल. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com