चंद्रकांत पाटील म्हणतात, 'काँग्रेसमुळे कोल्हापुरात महापूर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 

पुणे : कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 

पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंचगंगा नदीची पूररेषा भाजपने बदलल्याचा आरोप केला जात आहे, त्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले, पूर रेषा बदलण्यासाठी आम्हाला आलेल्या प्रस्तावानुसार किमान 1 हजार हेक्‍टर जमीनीचा विकास करता येऊ शकतो. त्यामुळे विकास होईल. नदीची पुररेषेचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच ही घटना घडली.

बिल्डरांच्या हितासाठी आम्ही पूररेषा बदलली नाही. 2005 ला पूर आला तेव्हा कॉंग्रेसची सत्ता होती. आलमट्टीची उंचीही काँग्रेसच्याच काळात वाढली. याच काळात अनधिकृत बांधकामे झाली. पूररेषा आखली म्हणून पूर येणार नाही असे नाही, तर आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता, पण तो किती पडणार हे कळत नाही. कोल्हापूरला जो पाऊस आला त्यावेळी चार महिन्याचा पाऊस चार दिवसांत पडला. कोणाच्याही हातात ही स्थिती नव्हती. भविष्यात ही असे होऊ नये यासाठी विचार करावा लागेल.

कोणत्याही धरणात 70 टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर धरणातून पाणी सोडावे असा कायदा करण्याचा विचार आहे. परत पाऊस पडेल की नाही या विचाराने अभियंते 95 टक्के धरण भरल्यावर पाणी सोडतात. यावेळीही असेच झाले. पण असा कायदा केल्यास पूराचा धोका कमी करता येईल, असे पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Policy of Congress Flood Comes in Kolhapur says Chandrakant Patil