"सकाळ"मुळे नगरच्या बाजारपेठेला नवी ऊर्जा : गडाख

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

या कौतुकास्पद उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना खरेदी, खाद्यसंस्कृती व मनोरंजन असा तिहेरी लाभ होतो, अशा शब्दांत यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी आज सकाळ शॉपिंग महोत्सवाचे कौतुक केले. 

नगर : ग्राहक, विविध उत्पादनांचे वितरक व उत्पादकांना एकाच छताखाली आणून नगर जिल्ह्याच्या नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यांतील बाजारपेठेला सकाळ माध्यम समूहाने नवी ऊर्जा दिली आहे. नेटकेपणा व उत्तमपणा ही या महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला त्यातून गती मिळण्यास नक्कीच मदत होईल. या कौतुकास्पद उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना खरेदी, खाद्यसंस्कृती व मनोरंजन असा तिहेरी लाभ होतो, अशा शब्दांत यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी आज सकाळ शॉपिंग महोत्सवाचे कौतुक केले. 

दिग्गजांची मांदियाळी
सकाळ शॉपिंग महोत्सवाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्या हस्ते फीत कापून झाले. त्या वेळी ते बोलत होते. "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, नेवाशाच्या माजी सभापती सुनीता शंकरराव गडाख, उदयन शंकरराव गडाख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, पोलिस निरीक्षक अविनाश मोरे, "हसत रहा, मंदार मुळे'चे संचालक मंदार मुळे, "मेहेत्रे डेकोरेटर्स'चे संचालक चंद्रकांत मेहेत्रे व संतोष मेहेत्रे, "जगदंब साउंड-लाइट'चे संचालक धनंजय वाघ, "राजहंस सिक्‍युरिटी'चे संचालक लक्ष्मण बेरड, गायक व स्थापत्य अभियंता अजय दगडे, पंजाब-सिंध बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष चौधरी, आरोग्यमित्र सुनील सुरवसे आदी उपस्थित होते. 

पारिजात चौकात फेस्टीव्हल
सावेडी भागातील गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकाजवळील तांबटकर मळा येथे आजपासून सुरू झालेला हा चार दिवसांचा महोत्सव रोज सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सुरू राहील. महोत्सवाचा समारोप रविवारी (ता. नऊ) रात्री दहाला होईल. नगर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात अनेक संस्थांचे जाळे असलेली यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स ही संस्था महोत्सवाची प्रायोजक आहे. "हसत रहा-मंदार मुळे' हे सीसीटीव्ही पार्टनर असून, "सोनी गिफ्ट्‌स' हे गिफ्ट पार्टनर आहेत. 

डॉ. बोठे पाटील "सकाळ"बाबत म्हणाले...
डॉ. बोठे पाटील यांनी प्रास्ताविकात महोत्सवाचा हेतू विशद करून, "सकाळ'च्या विविध उपक्रमांचाही आढावा घेतला. मुख्य व्यवस्थापक नीलेश सोनवणे यांनी स्वागत केले. मुख्य बातमीदार विठ्ठल लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक व्यवस्थापक गिरीश रासकर यांनी आभार मानले. 

रास्त भावात गृहोपयोगी वस्तू
सकाळ शॉपिंग महोत्सवातून ग्राहकांना रास्त भावात गृहोपयोगी वस्तू उपलब्ध होतील. त्यासोबत उद्योजकांना बाजारपेठेत पोचण्यासाठी नवे दालन उपलब्ध होईल. "सकाळ'च्या अभिनव संकल्पनेमुळे एकाच छताखाली सर्व उत्पादने मिळवून देणारी चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली. हा उपक्रम स्तुत्यच आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

"सकाळ'ने शॉपिंग महोत्सवामुळे बाजारपेठेत एक नवा पायंडा पाडला आहे. हा उपक्रम स्तुत्यच आहे. याचा नगर शहर व जिल्ह्यातील ग्राहक, तसेच वितरक व उत्पादकांना थेट फायदा होईल. तसेच या महोत्सवातून बाजारपेठेला नवी चालना मिळेल. 
- सागर पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक 

नगरकर दर वर्षी या महोत्सवाची वाट पाहत असतात. ग्राहकांना येथे अव्वल दर्जाच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध होतात. त्यासोबत महोत्सवातील खाद्यसंस्कृतीचा आस्वादही मिळत असतो. साहजिकच वर्षातून एकदाच नव्हे, तर दोनदा हा महोत्सव राबवायला हवा. 
- दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

आज "म्युझिकल मेलडीज' कार्यक्रम 
सकाळ शॉपिंग महोत्सवात उद्या (शुक्रवारी) सायंकाळी सहाला "म्युझिकल मेलडीज' या कार्यक्रमात सुपरहिट गाण्यांवर तरुणाईला थिरकण्याची संधी असेल. नगरचे स्थापत्य अभियंता व प्रसिद्ध गायक अजय दगडे यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमातून गायिका वैभवी कदम, दुर्योधन भारस्कर व गौरव पवार यांच्या सुरेल आवाजात मराठी व हिंदी गाणी नगरकरांना ऐकायला मिळतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the "sakal" new energy to the ahmednagar market