बनावट नोटा एटीएममध्ये जमा; बँकेच्या अधिकाऱ्यास अटक

इस्लामपूरमधील प्रकार; संशयिताला पोलिस कोठडी
Arrest
ArrestSakal

इस्लामपूर - एटीएम मशिनवरून मित्राच्या खात्यात बनावट नोटा टाकून त्या चलनात आणण्याचा प्रकार इस्लामपूर येथे उघडकीस आला. पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी कामेरी (ता. वाळवा) येथील एचडीएफसी बँकेतील अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी (वय ३०, रा. कामेरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आयसीआयसीआय बँकेचे उपव्यवस्थापक रवींद्र आबासाहेब महाले (वय ३०, रा. कामेरी नाका, किसन नगर, इस्लामपूर) यांनी याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संग्रामने त्याचा मित्र विशाल मोरे यांच्या खात्यात पाचशेच्या सहा बनावट नोटा आझाद चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या शेजारील एटीएम मशिनमध्ये जमा केल्या होत्या. १३ मे रोजी दुपारी दोन वाजता आयसीआयसीआय बँकेचे उपव्यवस्थापक रवींद्र महाले व कॅशियर रोहित पवार यांनी कॅश डिपॉझिट मशिनमधून जमा झालेली रक्कम काढून घेतली. १४ ते १६ मे दरम्यान बँकेला सुटी होती; परंतु एटीएम मशिन सुरू होते. १७ मे रोजी सकाळी श्री. महाले व कर्मचारी सुशांत सूर्यवंशी या दोघांनी डिपॉझिट मशिनमधील रक्कम काढली असता, त्यामध्ये पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा वेगळ्या बॉक्समध्ये जमा झालेल्या दिसून आल्या. त्या नोटा झेरॉक्स प्रती असल्याचे दिसले.

तपासणीत या नोटा विशाल विश्वकांत मोरे (रा. नवेखेड/जुनेखेड, ता. वाळवा) यांच्या खात्यात त्या जमा केल्याचे समजले. विशाल यांना बँकेने बोलावून चौकशी केली असता त्यांनी खात्यात पैसे टाकले नसल्याचे सांगितले. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकाने तोंडाला मास्क लावून रक्कम डिपॉझिट केल्याचे दिसले. विशालकडे चौकशी केली असता ती व्यक्ती मित्र संग्राम सूर्यवंशी यांची असल्याचे स्पष्ट झाले. संग्राम एचडीएफसी बँकेमध्ये नोकरीस आहे. त्याने विशाल यांना फोन करून खातेनंबर विचारून घेतला होता. त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये टाकतो. ते परत ऑनलाईन खात्यामध्ये पाठवण्यास सांगितले; परंतु विशाल यांनी तीन हजार रुपये जमा न झाल्याने ते संग्रामला पाठवले नाहीत.

संग्राम सूर्यवंशी याला बँकेत अधिकाऱ्यांसमोर बोलावून घेतले. चौकशीत संग्रामने असा प्रकार केलाच नसल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती ‘मी नाही’ असे सांगितले. बँकेचे व्यवस्थापक योगेश जोशी यांनी पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. विशाल व संग्राम यांना घेऊन श्री. महाले पोलिस ठाण्यात गेले. पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता संग्रामने बनावट नोटा जमा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com