बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

सोलापूर जिल्ह्यातील मोरोची येथे नोटा बनवणाऱ्या संशयितासही अटक करण्यात आली

सांगली - दोनशे आणि दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने जेरबंद केली. त्यांच्याकडून लाखाचा बनावट नोटांसह कलर प्रिंटर, एलसीडी स्क्रीन, स्कॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मोरोची येथे नोटा बनवणाऱ्या संशयितासही अटक करण्यात आली. 

विजय बाळासो कोळी (वय 33, रा. अमर चौक, रेठर धरण, सध्या रा. दत्तनगर, कुपवाड), शरद बापू हेगडे (वय 34, रा. राम-रहिम कॉलनी, संजयनगर) आणि तेजस उर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (वय 23, गावठाण, मोरोची, ता. माळशिरस, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांनी दोनशे आणि दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. 

अधिक माहिती अशी, जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक गेडाम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने संशयितांचा शोध घेवून कारवाईचे आदेश एलसीबीला दिले. त्यानुसार निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आली.

पथकातील पोलिस कुपवाड परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी कुपवाडमधील दत्तनगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय कोळी व शहर हेगडे संशयास्पदरित्या फिरताना मिळून आले. त्याच्याकडून झडती घेतली असता विजय कोळी याच्याकडे दोन हजारांच्या दहा नोट, तर हेगडे याच्याकडे 29 नोटा मिळून आल्या. नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे दिसून आल्या. 

हे पण वाचा - ...अन्यथा खुर्चीवर बसणे मुश्‍कील ; शिवसेनेचा अधिकाऱ्यांना इशारा

 

विजय याच्याकडे चौकशी केली असता शरद हेगडे याने नोटा चलनात आणण्यासाठी दिसल्याची कबुली दिली. तसेच हेगडे याच्याकडे चौकशी केली असता त्याचा नातेवाईक भावड्या गोरे याने या नोटा बनविल्याची कबुली दिली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तातडीने सोलापूर जिल्ह्यात छापा मारला. गोरे याच्या घरात बनावट नोटा मिळून आल्या. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: duplicate note gang arrested sangli s p