ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा

दत्तात्रय खंडागळे :
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

-  सांगोला तालुका हा डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखला जातो.

- परंतु आज ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. 

संगेवाडी : सांगोला तालुका हा डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखला जातो. परंतु आज ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. 

निरा उजवा कॅनॉलचे पाणी न मिळाल्याने संगेवाडी परिसरात मांजरी, शिरभावी, धायटी, मेथवडे, देवकतेवाडी, हलदहिवडी भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी उन्हाळा हंगामातही या भागास मिळाले नव्हते. ऐन पावसाळ्यातही अध्याप नीरा उजवा कालव्याचे पाणी येथे मिळाले नसल्यामुळे डाळिंब बागा सुकून जाऊ लागल्या आहेत. एकीकडे महापुर दुसरीकडे पाण्याचा मोठा दुष्काळ अशी परिस्थिती झाली आहे. संगेवाडी व परिसरात अध्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. तालुक्यातील सर्वात कमी पावसाची नोंद संगेवाडी येथे झाली आहे.

तर सध्या डाळिंब बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना विकतचे टँकरचे पाणी द्यावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना मोठी तळी आहेत अशा शेतकऱ्यांच्या बागा सध्या सुस्थितीत आहेत. परंतु ज्यांना शेततळी नाहीत अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बागा जगविणे मुश्कील बनले आहे. खडकाळ जमिनीमध्ये असलेल्या डाळिंब बागांना सतत पाणी द्यावे लागत आहे. एका छोट्या -मोठ्या  टँकरसाठी शेतकरी २२०० ते २५००  रुपये देऊन विकतचे पाणी घेत आहेत.

शेतकरी आपल्या शेतात छोटासा खड्डा करून त्यामध्ये टँकरचे पाणी साठवून ठेवत आहे. साठवलेले पाणी विद्युत मोटारीने बागांना देत आहे. विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांना सध्या बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर डाळिंबाचा बहर धरला आहे, पाऊसच नसल्याने या परिसरातील पशुधन छावणीवर असून बहरलेल्या बागा सुकू लागल्या आहेत. बागांना निरा उजवा कॅनॉलचे पाणी मिळेपर्यंत जगविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी ऐन पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.

"पाऊस पडेल या आशेवर मी डाळिंबाचा बहर धरला असून सध्या विहीर आणि बोअर कोरडे पडल्याने मला कॅनॉलचे पाणी येईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. एका टँकरसाठी २५०० रुपये द्यावे लागत आहेत"
- सोपान खंडागळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी.

"नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे राजकारण सोडुन नियमानुसार टेल टु हेड पाणी दिल्यास आमच्या भागास सध्यस्थितीचे एवढे पाणीसंकट आले नसते. उन्हाळ्यातही पाणी मिळाले नव्हते, आता तरी कँनोलचे लवकर पाणी सोडावे."
 - आप्पासो खंडागळे, डाळिंब उत्पादक शेतकरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During monsoons too pomegranate gardens are supplied water through tankers