esakal | कोरोनाच्या सावटातही दसऱ्याला मोठी उलाढाल; बाजारपेठेत गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Dussehra also has a large turnover in the corona effect; Crowds in the market

विजयादशमी अर्थात दसरा सणावर कोरोनाचे सावट जाणवले. मात्र सावट असले तरी बाजारपेठेत उलाढाल बऱ्यापैकी झाली.

कोरोनाच्या सावटातही दसऱ्याला मोठी उलाढाल; बाजारपेठेत गर्दी

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी अर्थात दसरा सणावर कोरोनाचे सावट जाणवले. मात्र सावट असले तरी बाजारपेठेत उलाढाल बऱ्यापैकी झाली. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोने-चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी-चारचाकी गाड्या खरेदीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. रविवारची सुटी आणि दसरा असा योग जुळून आल्यामुळे खरेदीच्या निमित्ताने काही काळ रस्ते गर्दीने फुलले होते. 

दरवाढ तरीही सोने-चांदी खरेदीला प्रतिसाद 
लॉकडाउनच्या काळात सोने-चांदी दरवाढीमुळे सामान्यांसाठी सोने खरेदी म्हणजे सुवर्णस्वप्नच बनले होते. याच काळात सोन्याने 50 हजारांचा टप्पा ओलांडला. जवळपास 56 हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत दर गेला होता. परंतु गेल्या काही दिवसात सोने-चांदी दरात घसरण झाल्यामुळे सामान्यांना नसला तरी इतरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी सोने-चांदी खरेदीला उत्साह दर्शवला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीची परंपरा अनेकांनी पूर्ण केली. सोन्याचा दर 51 हजार 600 रुपये तोळा तर चांदीचा दर 63 हजार 500 रुपये किलोपर्यंत होता. सांगलीतील नामांकित सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दीचे चित्र दिसले. तर इतर दुकानामध्ये तुरळक प्रमाणात ग्राहक होते. कोरोनाच्या सावटातही सोने खरेदीसाठी 40 टक्‍क्‍यांहून अधिक प्रतिसाद मिळाला असल्याचे सराफ दुकानदारांनी सांगितले. जिल्ह्यातील सोने-चांदी खरेदीची उलाढाल सुमारे 12 कोटींच्या आसपास असल्याची माहिती पुढे आली. दसऱ्यामध्ये बऱ्यापैकी उलाढाल झाल्यामुळे दिवाळीत त्याहून अधिक उलाढाल होईल अशी शक्‍यता वर्तवली जाते. 

ऑटोमोबाईल क्षेत्राला बुस्टर 
यंदाच्या दसऱ्याला ऑटोमोबाईल क्षेत्राला बुस्टर मिळाल्याचे चित्र दिसून आले. पाच महिन्यांनंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे समाधान वितरकांनी व्यक्त केले. कोट्यवधींची उलाढाल या क्षेत्रात झाली. "सिद्धिविनायक हिरो' आणि "सिद्धि व्हिल्स्‌'चे संचालक श्रीकांत तारळेकर "सकाळ'शी बोलताना म्हणाले,""दुचाकीला यंदा मोठ्याप्रमाणावर मागणी असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सुमारे हिरोच्या 711 गाड्यांची विक्री एका दिवसात झाली. त्यात मोपेडसह साऱ्याच दुचाकीला चांगली मागणी होती. इतर कंपन्यांच्या दुचाकीलाही चांगली मागणी दिसून आली. सुमारे दीड ते दोन हजार दुचाकींची दिवसात विक्री झाली. चारचाकीला चांगली मागणी असल्याचे दिसले. पाचशेहून अधिक चारचाकीची विक्री झाली आहे. पाच महिन्यांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली आहे.'' शेतकऱ्यांचा साथी असलेल्या ट्रॅक्‍टरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे दिसले. णमो ट्रॅक्‍टरचे संचालक जयकुमार बाफना म्हणाले,""सरकारी अनुदान आणि विविध ऑफर्समुळे ट्रॅक्‍टरची चांगली विक्री यंदा झाली. विविध कंपन्यांच्या सुमारे तीनशे ट्रॅक्‍टर एका दिवसात विक्रीचा अंदाज आहे.'' 

एलईडी, फ्रीजसह मोबाईल विक्री 
पाच महिन्यांपासून घरी असणाऱ्या सांगलीकरांनी दसऱ्यानिमित्त मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. त्यात सर्वाधिक मोठी उलाढाल इलेक्‍ट्रॉनिक्‍स्‌ विश्‍वात झाल्याचे दिसून येत आहे. विक्रेत्यांनी दिलेल्या खास सवलती आणि ऑफर्सचा ग्राहकांना लाभ घेतला. त्यामुळेच यंदा प्रथमच ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एसआरडीचे संचालक विजय लड्डा म्हणाले,""यंदा एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, रोटी मेकर, आटा मेकर, इस्त्रीसह विविध इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंना चांगली मागणी होती. सर्वच विक्रेत्यांनी ऑफर्स दिल्याने चांगली विक्री झाली.'' नानवाणी मोबाईलचे संचालक अजय नानवाणी म्हणाले,""दसऱ्यानिमित्त मोबाईल विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. अनलॉक कळात प्रथम मोठ्याप्रमाणावर विक्री झाल्याचे दिसून आले. स्मार्ट फोन्स्‌ना तरुणाईसह ज्येष्ठांनी पसंती दिल्याचे चित्र यंदा पहायला मिळाले. तसेच विविध ऑफर्सचाही ग्राहकांना फायदा झाला.'' 

बांधकाम क्षेत्राला उभारी; बुकिंग, साईट भूमीपूजनला उत्साह 
स्टॅम्प ड्युटीतील सवलत आणि गृह कर्जाचे घटलेले व्याजदर यामुळे बांधकाम व्यवसायात उभारी आल्याचे चित्र दिसत आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर काही फ्लॅटसचे बुकिंग, नवीन साईटचे भूमीपुजन झाले. शिवाय फ्लॅट्‌सची चौकशीही मोठ्या प्रमाणात झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे. सुमारे 40 ते 50 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. शासनाने या व्यवसायाला गती देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये तीन टक्के सवलत दिली. बॅंकांनीही गृह कर्ज कमी केले. त्यामुळे दसऱ्याला चांगली गर्दी दिसली. सुमारे 20 ते 25 नवीन फ्लॅट बुकींग झाले. तसेच प्लॉट खरेदी-विक्री व्यवहारही चांगले झाले. तर महापालिका क्षेत्रात 10 ते 12 ठिकाणी नवीन साईट्‌सचे भूमीपुजन झाले. दसऱ्यानिमित्त सुमारे 40 ते 50 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज होत आहे. 

दसऱ्यानिमित्त मोठी उलाढाल
कोरोनामुळे ठप्प असलेले बांधकाम क्षेत्र आता हळूहळू गती घेत आहे. स्टॅम्प ड्युटीतील सवलत आणि गृह कर्जाचे सात टक्‍क्‍यांच्या आत आलेले व्याजदर यामुळे दसऱ्यानिमित्त मोठी उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. 
- उत्तम आरगे, समन्वयक, सांगली क्रेडाई 

बांधकाम व्यवसायिकांमध्ये उत्साह

सहा महिन्यांनंतर बांधकाम व्यवसायिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर फ्लॅट बुकिंग, जागा खरेदी तसेच नवीन साईटचे भूमीपूजन मोठ्याप्रमाणात झाले. ग्राहकांमध्येही उत्साह असल्याने नवीन घर, ऑफिससाठी चौकशीही वाढत आहे. 
- रवींद्र खिलारे, अध्यक्ष, सांगली क्रेडाई 

संपादन :  युवराज यादव