esakal | दसरा सण मोठा : कोरोनानंतर प्रथमच बाजारपेठ सजली; मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Dussehra festival : Market decorated for the first time after Corona; Expect a large turnover

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त सांगलीची बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेतील विविध विक्रेत्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.

दसरा सण मोठा : कोरोनानंतर प्रथमच बाजारपेठ सजली; मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त सांगलीची बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेतील विविध विक्रेत्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच बाजारपेठेत खरेदीची चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून दीडशे रुपये किलो दराने विक्री होत आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू आणि सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी महापुराचे संकट येऊन गेल्यावरही दसरा दिवाळीला बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाली होती. यंदा कोरोनाचे संकट आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा सण विशेष महत्त्वाचा आहे. दसऱ्याला हमखास सोने खरेदी केली जाते. मागील काही महिन्यापासून सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. 

सध्या सोनेदर 51 हजार 650 रुपये तोळे (दहा ग्रॅम) तर चांदी दर 64 हजार रुपये किलो आहे. मागील आठवड्यापासून सोने व्यावसायिकांनी सोने खरेदीवर विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याचमुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी सराफ पेठेत गर्दी केली असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. मात्र मुहूर्तावर सोने खरेदी असल्यामुळे उद्या सराफ पेठेत गर्दी असणार आहे. विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खरेदीवर शून्य टक्के व्याजदराची सुविधा देण्यात आली आहे. दुकानदारांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध वस्तूंवर सूट दिलेली आहे. दसऱ्याला खरेदी करायची असे ठरवून काही नागरिकांनी वस्तूंचे बुकिंग करून ठेवले आहे. 

बिल्डरांनी देखील नवीन फ्लॅटचे बुकिंग सुरू केले आहे. भविष्यातील गुंतवणूक किंवा गरज म्हणून काहींनी फ्लॅट घेण्यास पसंती दिली आहे. वाहन उद्योगात देखील समाधानाचे वातावरण असून दुचाकी वाहनांना ग्राहकांची मागणी आहे. बाजारपेठेतील सकात्मक चित्र पाहता मंदीच्या वातावरणात देखील जिल्ह्यात कोट्यवधीची उलाढाल अपेक्षित आहे.

आज दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दीडशे रुपये किलो दराने फुलांची विक्री होत होती. आपट्याची पाने देखील मोठ्या प्रमाणात विक्रीस आहेत. मिठाईची दुकाने देखील सजली आहेत. एकूण आशादायक चित्र असल्यामुळे दसऱ्याला ग्राहकांच्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायची चिन्हे आहेत. 

संपादन : युवराज यादव

loading image