सरपंच, सदस्यांनीच नाही भरली पाणीपट्टी, घरपट्टी: म्हणून...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गुंडेवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंडेवार यांनी ग्रामपंचायतीला कामासंदर्भात अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा अहवाल पाठवा, असा आदेश विस्ताराधिकाऱ्यांना दिल्याने सर्व सदस्यांचे धाबे दणाणले.

एरंडोली : गुंडेवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंडेवार यांनी दलित वस्तीच्या कामासंदर्भात ग्रामपंचायतीला मंगळवारी (ता. 19) भेट दिली. या वेळी अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा अहवाल पाठवा, असा आदेश विस्ताराधिकाऱ्यांना दिल्याने सर्व सदस्यांचे धाबे दणाणले. 

मिरज तालुक्‍यातील गुंडेवाडी ग्रामपंचायतीत सरपंचांसह 12 सदस्य आहेत. मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडेवार यांनी गुंडेवाडी ग्रामपंचायतीस दलित वस्तीच्या एका कामासंदर्भात भेट दिली व सदर टेंडर पुन्हा काढण्यास सांगितले. या वेळी ग्रामसेविका यांना गावात घरपट्टी व पाणीपट्टी किती वसुली आहे, याबाबत विचारले त्या वेळी 20 ते 30 टक्के वसुली असल्याचे सांगितले. समोरच असणाऱ्या सरपंचांना गुंडेवार यांनी तुम्ही घरपट्टी, पाणीपट्टी भरली का, असे विचारले तर सरपंचांनी नाही, असे सांगितले.

तुम्हीच कर भरत नाही, मग गाव कसे भरेल, असे सुनावले. त्या वेळी वरिष्ठ अधिकारी आल्याने ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टी न भरलेले कारभारी सत्कार करण्यास पुढे सरसावले; पण गुंडेवार यांनी ज्या गावात वसुली नाही, त्या गावचा सत्कार स्वीकारत नाही, असे सांगून पंचायत समिती विस्तार अधिकारी (ग्रा. पं. विभाग) एस. टी. मगदूम यांना घरपट्टी, पाणीपट्टीचा अहवाल व ग्रामपंचायत बरखास्तीचा अहवाल तत्काळ सादर करा, असे आदेश दिले. 

गुंडेवारांच्या या आदेशाने गुंडेवाडीसह तालुक्‍यातील व जिल्ह्यातील सर्व घरपट्टी, पाणीपट्टी न भरणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहे. मगदूम यांनी सर्व अहवाल तयार करून गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्याकडे दिला. सरगर यांनी अहवाल गुंडेवार यांना सादर केला असून, गुंडेवाडी ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या अहवालात 2019- 20 या वर्षात घरपट्टी आठ लाख 25 हजार 213 असताना एक लाख 61 हजार 74 रुपये इतकीच वसुली झाली आहे. पाणीपट्टी चार लाख 66 हजार 284 असताना वसुली मात्र एक लाख 94 हजार 387 इतकी झाली. तसेच, सरपंच व 12 सदस्यांपैकी चार सदस्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली आहे. 70 टक्‍क्‍यांपेक्षा घरपट्टी व पाणीपट्टी कमी वसुली असेल आणि सरपंच, सदस्यही घरपट्टी, पाणीपट्टी भरत नसतील तर त्यावर शासकीय परिपत्रकानुसार (क्रमांक- पीआरसी 1076/2335/23, मंत्रालय, मुंबई- 31 जानेवारी 1977) सरपंच, ग्रामसेवक, सदस्य हे आपले कर्तव्य पार पाडण्यात कमी पडल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी सरगर यांनी आपला अहवाल गुंडेवार यांना सादर केला. आता यावर काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायत बरखास्त होणार? 
नियमानुसार ग्रामपंचायतीत सदस्यांचे बहुमत आवश्‍यक असते. गुंडेवाडी येथील आठ सदस्य अपात्र ठरले, तर चार सदस्यांवर ग्रामपंचायत चालेल का, त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त होण्याची शक्‍यता आहे, असे जाणकार सांगत आहेत. फेब्रुवारीत पंचायत समिती स्तरावर झालेल्या ग्रामसेवकांच्या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंडेवार यांनी थकीत वसुलीबाबत सक्त निर्देश दिले होते. त्याही आदेशाचे पालन न झाल्याची चर्चा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dy. CEO orders to Send report of dismissal of Gundewadi Gram Panchayat