मिरज पूर्वभागात झपाट्याने वाढू लागलेत कोरोना बाधित

शंकर भोसले 
Monday, 5 October 2020

कोरोना बाधित रुग्ण मिरज पूर्वभागात झपाट्याने वाढू लागले आहेत. लॉकडाउनमध्ये तुरळक असणाऱ्या रुग्ण संख्येने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

मिरज : कोरोना बाधित रुग्ण मिरज पूर्वभागात झपाट्याने वाढू लागले आहेत. लॉकडाउनमध्ये तुरळक असणाऱ्या रुग्ण संख्येने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

ऑनलॉकनंतर रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते आहे; तर शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सलगरे, आरग, बेडग यांसह अनेक गावात ग्रामपंचायत आणि लोक वर्गणीतून कोविड सेंटर उभारू लागले आहेत. पूर्व भागातील बाधितांचा इतिहास पाहता रुग्ण संख्येत सर्वाधिक बाधा ही ज्येष्ठांना झाली आहे. यामुळे मृत्यूचे आकडा देखील वाढतच आहे. 

कोरोना संसर्गानंतर या भागात रुग्णांची संख्या ही हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच होती. नंतर ऑनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर रुग्ण संख्येनेही गती घेतली. सध्या आरग, अंकली, सलगरे, बेडग, इनामधामणी, सोनी, भोसे, एरंडोली या गावांनी आजपर्यंत रुग्णांची शंभरी पार केली आहे. तर टाकळी, मालगाव, सोनी, म्हैसाळ येथे दोनशे रुग्ण संख्या झाली आहे. सध्या, भोसे, आरग, एरंडोली, खंडेराजुरी, म्हैसाळ या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गावनिहाय कोरोना बाधितांचा आणि लक्षणे नसणा-यांचे सर्वेक्षण आशा सेवकांकडून सुरू आहे. 

उपचाराच्या खर्चामुळे चाचणीस टाळाटाळ 
कोरोना संसर्ग झाल्यावर रुग्णालयाचा आर्थिक भुर्दंड बसत असल्यामुळे भीतीने सौम्य लक्षणे असलेल्या अनेकांनी कोरोना चाचणी करून घेणे टाळले आहे. लक्षणे तीव्र झाल्यावर शेवटच्या टप्प्यात उपचार सुरू घेतल्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढू लागली आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य उपकेंद्रात चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. 

मिरज पूर्व भागातील कोरोना दक्षता समिती आणि प्राथमिक उपक्रेंद्राकडून गाव पातळीवर घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आशा सेविकांकडून माहिती संकलित केली जात आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना उपचारांसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे; तर तीव्र लक्षणे असणाऱ्यांना पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात पाठवले जात आहे. 
- विजय सावंत, तालुका आरोग्याधिकारी मिरज

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the eastern part of Miraj the corona began to grow rapidly