आटपाडी तालुक्‍यात परतीच्या पावसाने दाणादाण; आठ ओढ्यांवरील पूल काही ठिकाणी खचले, वाहून गेले

नागेश गायकवाड
Tuesday, 13 October 2020

परतीच्या पावसाने आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची पुरती दाणादाण उडवून टाकली आहे. काल अवघ्या दोन तासांमध्ये खरसुंडी मंडलामध्ये विक्रमी 126 मिलिमीटर पाऊस कोसळला.

आटपाडी (जि . सांगली) : परतीच्या पावसाने आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची पुरती दाणादाण उडवून टाकली आहे. काल अवघ्या दोन तासांमध्ये खरसुंडी मंडलामध्ये विक्रमी 126 मिलिमीटर पाऊस कोसळला; तर यावर्षी आटपाडी आणि खरसुंडी मंडलमध्ये विक्रमी 900 मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे. काल रविवारी खरसुंडी मंडलामध्ये अवघ्या दोन तासांत विक्रमी 126 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे लहान-मोठ्या आठ ओढ्यांवरील पूल काही ठिकाणी खचले, वाहून गेले असून, या पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. 

खरसुंडी, नेलकरंजी, हिवतड, गोमेवाडी, बनपुरी, करगणी, शेटफळे या भागांत अतिवृष्टी झाली. घाटमाथ्याखाली पाऊस झाल्यामुळे करगणी, शेटफळेतील बेलवण आणि आटपाडीतील शूक ओढ्याच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. या दोन्ही ओढ्यांचे पाणी पात्राबाहेर गेले. पावसामुळे राज्य महामार्ग दिघंची-हेरवाडवरील शेटफळे येथील ब्रिजसह माळेवाडी, शेटफळे-करगणी, शेटफळे-रेबाई, नेलकरंजी गावाला जोडणारा मुख्य एक आणि वाडी-वस्तीवर जाणारे दोन, तळेवाडी करगणी रस्त्यावरील एक अशा लहान-मोठ्या आठ ओढ्यांवरील पूल काही ठिकाणी खचले, वाहून गेले असून, या पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिटकी येथील ओलेकर साठवण तलाव वीस वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून केला होता. नुकतेच त्याचे गाळ भरण्याचे कामही हे केले होते. हा तलाव सांडव्याच्या ठिकाणी फुटला असून, मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय बारा ते पंधरा पूल पाण्याखाली गेले होते. आटपाडीच्या फरशी पुलावरून पाणी गेले त्यामुळे ओढ्यालगत असलेली पाच खोके या पाण्यासोबत वाहून गेली. 

शनिवारी आटपाडी तालुक्‍यात सरासरी 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर रविवारी सायंकाळी अवघ्या दोन तासांमध्ये खरसुंडी मंडलमध्ये 126 मिलिमीटर पाऊस पडला. घाटमाथ्याखाली नेलकरंजी, खरसुंडी, गोमेवाडी, बनपुरी, करगणी आणि शेटफळे परिसरात प्रचंड कोसळला. दुष्काळी आटपाडी तालुक्‍यात पावसाची सरासरी 250 ते 300 मिलिमीटर असते. यावर्षी पावसाने कहर केला असून, तब्बल विक्रमी 900 मिलिमीटरचा टप्पा जवळ केला आहे. पावसामुळे माळवदी घरांची मोठी पडझड झाली आहे. तसेच शेकडो हेक्‍टर डाळिंबाच्या बागा पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाने मेटाकुटीला आलेल्या डाळिंब उत्पादकांनी निसर्गापुढे हात टेकले असून, बागा अनेकांनी सोडून दिल्या आहेत. 

आटपाडी तालुक्‍यात विक्रमी पाऊस 
आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक खरसुंडी मंडलमध्ये 889, आटपाडी 878आणि दिघंची 750 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. तालुक्‍यात सरासरी 840 मिलिमीटरची नोंद झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांतील विक्रमी नोंद असल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eavy rain in Atpadi taluka; Bridges over eight streams wahsed away