
सांगली जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 141 ग्रामपंचायती निवडणुकीच्या अधिकृत प्रचाराचा नारळ आज फुटला.
सांगली ः जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 141 ग्रामपंचायती निवडणुकीच्या अधिकृत प्रचाराचा नारळ आज फुटला. पुढील दहा दिवस फिरून बैठका घेऊन, सभा व मेळावे घेऊन प्रचाराचा धुरळा उडणार आहे. काल (ता. 4) सायंकाळी चिन्ह मिळाल्यावर उमेदवारांनी लगबगीने पत्रके छापण्याची घाई सुरू केली. पायाला भिंगरी लावून गाव पिंजून काढले जाणार आहे.
जिल्ह्यातील 152 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता 141 गावांमध्ये टशन सुरू आहे. बहुतांश ठिकाणी एकास एक अशा स्वरूपाच्या लढती आहेत. काही ठिकाणी तिरंगी लढती होतील. या साऱ्यासाठी आता दहा दिवसांचा अवधी आहे. प्रभाग छोटे आहेत, मतदार संख्या 800 ते एक हजार 200 च्या घरात आहे. त्यामुळे हा कालावधी तुलनेत पुरेसा ठरेल.
घर टू घर फिरून प्रचारासाठीही भरपूर अवधी मिळाला आहे. त्यामुळे आता प्रचारात हळूहळू रंग भरत जाणार आहेत. काही ठिकाणी गाठी मारल्या जातील, काही ठिकाणी सैल होतील, त्या पुन्हा मजबूत करण्याची धडपड होईल. हा खेळ दिवसरात्र रंगणार आहे. अफवांचा बाजार आधीच सुरू झाला आहे. "मी त्यांच्याबरोबर फिरत असलो तरी मतदान तुम्हालाच करणार हाय', हे प्रसिद्ध वाक्य आता गावागावांत ऐकायला मिळते.
या प्रचाराची रंगत सोशल मीडियामुळे भलतीच वाढली आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. त्यामुळे विचार पोचविण्यात तशी फारशी अडचण नाही. परंतू, गावपातळीवरील तिढे सोडविण्यात जो यशस्वी होईल तोच गाव जिंकेल. त्यामुळे मुरब्बी नेत्यांची या निवडणुकीवर पकड दिसते आहे.
त्याचवेळी युवकांनी उडी घेत नवे कारभारी निवडा, असे आवाहन लोकांना केले. काही ठिकाणी नव्या-जुन्यांची भट्टी पक्की जमवण्यात आली आहे. सुशिक्षित महिला उमेदवार निवडत लोकांसमोर चांगले पर्याय देण्यात आले. आता नारळ फुटला असून, प्रचार रंगत जाणार आहे.
संपादन : युवराज यादव