भगवान झाला लॉर्ड, आनंदचा हॅप्पी आणि छाया बनली शॅडो...

प्रमोद माने
गुरुवार, 9 जानेवारी 2020

लॉर्ड, हॅप्पी, बेस्ट, स्प्रिंग, शॅडो.... हे इंग्रजी शब्द आहेत, हे कोणीही वेगळे सांगायला नको. पण, ही चक्‍क आपल्या शेतकऱ्यांची नावे आहेत, असे सांगितले तर साऱ्यांचीच बोटे तोंडात जातील. मात्र हे असे घडले आहे खरे... सरकारी घोळाचा हा परिणाम आहे...

बावची (सांगली) : लॉर्ड, हॅप्पी, बेस्ट, स्प्रिंग, शॅडो.... हे इंग्रजी शब्द आहेत, हे कोणीही वेगळे सांगायला नको. पण, ही चक्‍क आपल्या शेतकऱ्यांची नावे आहेत, असे सांगितले तर साऱ्यांचीच बोटे तोंडात जातील. मात्र हे असे घडले आहे खरे... सरकारी घोळाचा हा परिणाम आहे...

हे पण वाचा -  खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान   

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या यादीतील नावात संगणकीय चुका झाल्या आहेत. या यादीत शेतकऱ्यांची नामांतरे झाली आहेत. यामध्ये भगवान नावाचा शेतकरी झालाय लॉर्ड, आनंद झालाय हैप्पी, उत्तम म्हणजे बेस्ट, शरद झालाय स्प्रिंग, तर छाया हिची शॅडो झाली आहे आणि निवास नाव रेसिडन्ट ऑफ इंडिया असे झाले आहे. केवळ नावातच नाही अडनावातही घोळ झाले असून, सुतार झालाय कारपेन्टर, माळी फ्लॉवर, तर कोष्टी आडनावाचा स्पायडर मॅन झाला आहे. गावोगावी प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये असे नामकरण झाले असून, यादीतील ही नावे व आधार कार्डावरील नावे जुळत नसल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याद्या अंतिम करताना याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता गावोगावी अपात्र नावांच्या याद्या प्रसिद्ध करून संबंधित शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्रात जाऊन आधार कार्डाप्रमाणे नावांची दुरुस्ती करण्याचा फतवा काढला आहे.

हे पण वाचा -  पत्ता सांगताय, थांबा ! 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर झाली त्यावेळी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक व विकास सोसायटीचे सचिव यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले. यात सात बारा, आधार कार्ड, बॅंक पास बुक आदी कागदपत्रे घेण्यात आली. ही सर्व कागदपत्रे संगणकावर भरण्यात आली, मात्र संगणक प्रणालीत शेतकऱ्यांनी नावे व आडनावे मराठीतून इंग्रजीत भरली गेली. यावेळी सदरची यादी संबंधित अधिकाऱ्यांनी वाचून मंजुरीस पाठवणे आवश्‍यक होते. मात्र असे न झाल्याने यापूर्वी दोन वेळी शेतकऱ्यांनी पूर्तता केली असूनदेखील या चुकीमुळे ते अद्याप योजनेपासून वंचित आहेत. आता पुन्हा त्यांना आधार कार्ड घेऊन महा-ई-सेवा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. आतापुन्हा रांगेत उभा राहून, आता तरी शेतकऱ्यांना योग्य सन्मान मिळणार की नाही ही चिंता आहे.

सरकारी घोळ
- यादीत नावातील इंग्रजी स्पेलिंगमध्ये चुका
- नावांमध्ये गमतीशीर बदल, अनेक नावांचे इंग्रजी भाषांतर
- अनेक शेतकऱ्यांचा फोन नंबर 9999999999

"गुगल ट्रान्सलेटर'चा परिणाम...
किसान सन्मान योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तत्काळ मागवण्यात आल्या होत्या. नावे संगणकावर भरताना "गुगल ट्रान्सलेट'वर भरल्यामुळे मराठी नावे त्यांच्या इंग्रजीतील अर्थाप्रमाणे भाषांतरित झाली आहेत. याद्या एक्‍सल शीटवर घेतल्यामुळे देखील चुका झाल्या आहेत. नावे दुरुस्तीसाठी महा-ई-सेवा केंद्रात सोय केली आहे, असे एका अधिकाऱ्याने न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ
माझे नाव उत्तम मारुती तळप ऐवजी बेस्ट मारुती तळप असे झाले आहे. याआधी दोन वेळा मी कागदपत्रे दिली आहेत. आता पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.
- उत्तम मारुती तळप, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eerrors in English Spelling of Farmer Name Lst at Sangli