पाचगणीतील गांधींच्या वस्तूंची वाताहत ; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

रविकांत बेलोशे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

वीरजी बंगला येथे गांधीजींनी लावलेला गुलमोहर अजूनही त्यांच्या वास्तव्याच्या स्मृती जागवत आहे.

भिलार : महात्मा गांधी आणि पाचगणी हे नात अगदी घनिष्ठ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान (1935 ते 1944) महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या पाचगणीतील दिलखुश बंगला, वीरजी बंगला, बाथा प्रार्थना सभागृह, बहाई भवन या वास्तू आजही त्यांच्या आठवणी जाग्या करतात. मात्र, याठिकाणी वास्तव्यादरम्यान गांधीजींनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या वस्तू आणि वास्तूंची वाताहत होत आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 ते 1944 या काळात पाचगणीतील दिलखुश बंगला, बाथा हायस्कूल, वीरजी बंगला, बहाईभवन येथे गांधीजींचे वास्तव्य होते. त्या वेळी पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवती राजगोपालचारी, सरहद्द गांधी, विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, नाना पाटील, साने गुरुजी अशा अनेक नेत्यांशी त्यांच्या बैठका चालायच्या. त्या वास्तूंमध्ये गांधीजींच्या वापराच्या अनेक वस्तू आजही टिकून आहेत. बाथाचे प्रार्थना सभागृह, वीरजीभाई यांना गांधीजींनी लिहिलेली पत्रे, 1940 मध्ये गांधीजींनी लावलेले गुलमोहराचे झाड अशा अनेक गोष्टी तेथे त्यांच्या आठवणी जागवतात. पाचगणीतील बेबी पॉइंटजवळील सध्याच्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलच्या वास्तूत कस्तुरबा गांधी व गांधीजींचे येणे- जाणे होते. 

या हॉस्पिटलमध्ये गांधीजींचे बाथटब अजूनही जतन करून ठेवले आहेत. 
बाथा हायस्कूल येथील सभागृहात गांधीजी प्रार्थना करत असत. याच ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी मारेकऱ्यांच्या हातातील सुरा हिसकावून भि. दा. भिलारे गुरुजींनी गांधीजींचे प्राण वाचवले होते. त्या प्रसंगाची साक्ष देणाऱ्या गोष्टीही येथे आहेत; परंतु या सर्वांचे योग्य जतन होत नसल्यामुळे त्यांची काळानुसार वाताहत होऊ लागली आहे. येथे कार्यरत असलेल्या महात्मा गांधी स्मारक समितीने गांधीजींचे चिरंतन स्मारक उभारण्यासाठी पुढाकारही घेतला आहे; परंतु त्याला म्हणावे, असे यश येत नाही. स्मारकाबाबत समिती आग्रही आहे; परंतु पाचगणीकरांची उदासीनता, शासनाची नकारात्मकता दिसत असल्यामुळे हे स्मारक अद्याप कागदावरच आहे. दर वर्षी या विषयाचा ऊहापोह होतो; पण हाती काहीही लागत नाही. पालिका प्रशासनाने कस्तुरबा गांधी रुग्णालयाजवळील रस्त्याला गांधी मार्ग नामकरण केले असून, ही एकमेव जमेची बाजू आहे. 

दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयातील गांधींचे वास्तव्य असणाऱ्या इमारतीला नवा "लुक' देण्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्याचा समितीने पुढे पाठपुरावाही केला; परंतु तो निधी कागदावरच राहिला. तो प्रत्यक्षामध्ये केव्हा येणार? अशी विचारणा होत आहे? शासनाने आणि पाचगणीकरांनी आपली उदासीनता झटकून या स्मारकाला सहकार्य करावे, असे आवाहन स्मारक समितीने केले आहे. 
 

पाचगणीतील गांधींजींच्या स्मृती जतन करण्याची व त्यांच्या सत्य, अहिंसा व शांती सद्भभाव विचार प्रचार केंद्र विकसित केले, तर गांधीजींच्या पाचगणीतील स्मृती पुढच्या पिढीला जिवंत राहतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

- किशोरभाई पुरोहित, गांधीवादी नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts need to be made to preserve the memory of Gandhiji in Panchagani