सांगली जिल्ह्यात सव्वाआठ हजार हेक्‍टरला फटका; कृषी विभागाची पंचनाम्याची तयारी सुरू

विष्णू मोहिते
Saturday, 17 October 2020

सांगली जिल्ह्यात गेल्या दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 629 गावातील 19 हजार 828 शेतकऱ्यांचे 33 टक्‍क्‍याहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सांगली : जिल्ह्यात गेल्या दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 629 गावातील 19 हजार 828 शेतकऱ्यांचे 33 टक्‍क्‍याहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी आज दिली. आठ हजार 276 हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचा नजर अंदाज आहे. 

जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पंचनाम्याची तयारी सुरु केली आहे. पावसाच्या उघडीपीचा आज पहिला दिवस आहे. प्रत्यक्ष जागेवर जावून आणि मोबाईल ऍपवर फोटो आवश्‍यक केल्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे बंधनकारकच होणार आहे. जिल्ह्यातील 620 गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. पंचनामा पथकात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या तिघांचे पथक असेल. पंचनामे तातडीने होण्यासाठी अधिकाऱ्यांना किमान शेतात जाण्यासाठी वापसा येण्याची गरज आहे. किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी जाणार आहे. सोमवारपासून पंचनामे सुरु झाल्यास चार दिवस पंचनामे पूर्ण होण्यासाठी कालावधी लागू शकतो. 

परतीच्या पावसाला जोडून राज्यभर मंगळवारी, बुधवारी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील दहा पैकी आठ तालुके तसेच 60 पैकी 36 मंडलातील गावांना याचा फटका बसला. राज्य सरकारने या वादळी पावसाच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे तातडीने पंचनामे सुरु होणे अपेक्षीत आहे. 

पीक निहाय बांधित क्षेत्र.... 
ज्वारी -1255 हेक्‍टर, बाजरी- 17.2 हेक्‍टर, कडधान्य- 374 हेक्‍टर, सोयाबीन- 654 हेक्‍टर, भूईमूग-1100 हेक्‍टर, भात-325 हेक्‍टर, मका- 976 हेक्‍टर, केळी- 18 हेक्‍टर, डाळिंब- 1366 हेक्‍टर, कांदा रोपवाटीका- 13.5 हेक्‍टर, भाजीपाला- 279 हेक्‍टर, ऊस- 483 हेक्‍टर, अन्य पिके 20 हेक्‍टर यांचा समावेश आहे. 

हातातोंडाला आलेले पिक वाया

शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेले पिक वाया गेले आहे. आता पंचनाम्यासाठीही पाच दिवस जातील. तोपर्यंत होणारे नुकसान शेतकऱ्यांनी पहात बसायचे का?. शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर काठलेले फोटो ग्राह्य धरण्याचे आदेश सरकारने द्यावेत. 
- विनायक पाटील, शेतकरी, काकडवाडी. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight and a half thousand hectares hit by Rain in Sangli district; Department of Agriculture begins preparation of Panchnama