एकाच रात्री आठ घरफोड्या; सुभाषनगर येथील प्रकार

प्रमोद जेरे
Monday, 4 January 2021

मालगाव (जि. सांगली) येथील सुभाषनगरमध्ये चोरट्यांनी शनिवारी (ता. 2) रोजी रात्री धुमाकूळ घातला.

मालगाव (जि. सांगली) : येथील सुभाषनगरमध्ये चोरट्यांनी शनिवारी (ता. 2) रोजी रात्री धुमाकूळ घातला. बंद असलेली घरे हेरून चोरट्यांनी व यापैकी आठ बंद घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. याची मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुभाषनगर येथील "क' गटामध्ये अर्बन कॉलनी मदिना मस्जिद आणि मुजावर प्लॉट या परिसरातील बंद असलेल्या घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. शनिवारी रात्री उशिरा चोरट्यांनी अचूकपणे बंद असलेल्या घरांना लक्ष्य बनवले. सलग आठ बंद घरांच्या दरवाजांची कुलपे तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि या सर्व घरांमधून रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने ऐवज लंपास केले. यामध्ये निवृत्त सैनिक, द्राक्ष व्यापारी, बंद दुकान गाळे, तसेच अन्य व्यावसायिक आणि नोकरदार घरमालक यांचाही समावेश आहे. यापैकी एकाही घरमालकाच्या घरास कुलपाशिवाय अन्य कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. चोरट्यांनी नेमका याचाच अचूक लाभ उठवला. 

शनिवारी रात्री एक वाजल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत चोरटे या परिसरात धुमाकूळ घालत होते. पोलिसांची गस्त सुरू असलेल्या मुख्य चौकापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातच या घरफोड्या झाल्या आहेत. अर्बन कॉलनी, मदिना मज्जित आणि मुजावर प्लॉट हा परिसर सुभाष नगरमधील मध्यवर्ती भाग समजला जातो. याठिकाणी घरांची रचना विरळ आहे. याच परिसरात या चोऱ्या झाल्या आहेत. चोरटे संख्येने जास्त असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या सर्व घरांचे चोरट्यांनी पुढचे दरवाजे तोडले आहेत. चोऱ्या करताना येथील एकाही शेजाऱ्यास चोरट्यांची चाहूल लागली नाही. ज्या घरांमध्ये चोरट्यांना काही हाती लागले नाही, तेथे चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात घरातील वस्तूंची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. सलग आठ घरांमध्ये चोऱ्या झाल्याने या परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी श्वानपथक बोलावण्यात आले; परंतु त्यालाही चोरट्यांचा माग सापडला नाही. मात्र, चोरट्यांच्या हातांचे बऱ्यापैकी ठसे मिळाले आहेत. 

दरम्यान, या घरफोड्यांबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात केवळ एकच तक्रार दाखल झाली आहे. निवृत्त नायब सुभेदार खुदबुद्दीन उमराणी यांनी त्यांच्या घरातून सात तोळे सोन्याचे दागिने, दीडशे ग्रॅम चांदीचे दागिने, तसेच वीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. याशिवाय याच परिसरातील सय्यद नामक द्राक्ष व्यापाऱ्याने भाड्याने घेतलेल्या बंगल्यातून त्यांच्या वाहन चालकांना देण्यासाठी ठेवलेली 42 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी पळवली. चोऱ्या झालेल्या अन्य घरमालकांच्या तक्रारी उद्या (सोमवारी) घेण्यात येणार आहे. एकूण चोरीच्या रक्‍कम त्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पोलिसांसमोर आव्हान 
एका रात्री सलग आठ घरांमध्ये चोऱ्या होण्याची मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे चोरट्यांची मोठी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे या चोऱ्यांच्या तपासाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight burglaries in one night at Subhashnagar