मिरजेत आठ महिन्यात "मियावाकी' वनराईने धरले बाळसे 

जयसिंग कुंभार
Monday, 28 September 2020

मिरज : येथील झारी बागेजवळील महापालिकेच्या खुल्या भुखंडावरील जिल्ह्यातील पहिल्या "मियावाकी' वनराई प्रकल्पाने आता चांगलेच बाळसे धरलेय.

मिरज : येथील झारी बागेजवळील महापालिकेच्या खुल्या भुखंडावरील जिल्ह्यातील पहिल्या "मियावाकी' वनराई प्रकल्पाने आता चांगलेच बाळसे धरलेय. अवघ्या आठ महिन्यात इथल्या झाडांनी आता आठ फुटांपासून बारा फुटांपर्यंत मजल मारली आहे. आता या हिरवाईची ओढ पक्षी,फुलपाखरांनाही लागलीय. 

महापालिका आणि नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीने साकारलेला हा प्रकल्प जिल्ह्यात अनेक अशा प्रकल्पासांठीची सूरवात ठरेल. जगप्रसिद्ध जपानी शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी सुमारे 60 वर्षे नैसर्गिक वननिर्मितीच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यासांती कृत्रिम वननिर्मितीची ही पद्धत विकसित केली आहे. त्यासाठी आधी शास्त्रशुध्द पध्दतीने जमीन तयार केली जाते. त्यानंतर खूप कमी अंतरावर म्हणजे अवघ्या गुंठ्ठयात 1550 रोपे लावण्यात आली. त्यामुळे या रोपांमध्ये पोषक जमीन आणि सूर्यप्रकाशासाठीची झाडांमध्ये स्पर्धा सुरु होते. 
परिणामी ही रोपे नेहमीपेक्षा 10 पट अधिक वेगाने वाढतात. नैसर्गिकरीत्या जंगल तयार होण्यास जिथे सुमारे 300 ते 500 वर्षांचा कालावधी लागतो तीच प्रक्रिया इथे अवघ्या 30 ते 50 वर्षांत घडते. या जंगलाची हवेतील कार्बनडायऑक्‍साईड शोषून घेण्याची क्षमता पारंपरिक वृक्षारोपणापेक्षा तीस टक्के अधिक असते. डॉ. मियावाकिंनी या पद्धतीचा उपयोग करून जपान, इटली, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील, चीन अशा अनेक देशांत अशी जंगले तयार झाली आहेत. 

मिरजेत या प्रकल्पांतर्गत एकाच दिवशी सुमारे 1550 झाडे लावण्यात आली. पिंपळ, नांद्रुक, पिपरणी, कांचन हिरडा, बेहडा, काटेसावर, देवसावर, ऐन, जांभूळ, आंबा, फणस, भेर्ली माड, पळस, पांगारा, खैर, सीताअशोक, माकडलिंबू, कारवी, अग्निमंथ, कवठ, नागचाफा, रिठा, शिवण, गूळभेंडी, बहावा, करंज, शिसम, उंडी अशा सुमारे 55 प्रजातींची अस्सल भारतीय स्थानिक झाडे लावण्यात आली. गेली आठ महिने त्यांना नियमित पाणी, भांगलण सुरु आहे. प्रामुख्याने पक्षी, फुलपाखरे, मधमाश्‍यांना आकर्षित करणारी ही झाडे आहेत. सध्या यातल्या चित्रक झुडपांवरील फुलांवर दहा ते पंधरा प्रकारच्या फुलपाखरे दाखल झाली आहे. निसर्गाचं चक्र असं असतं. या चक्राची अनुभूती घ्यायची तर जरुर या मियावाकी प्रकल्पाला मिरजेत भेट द्या. 

 आठ महिन्यातील दोन ते तीन टक्केच रोपांची मर आहे. आणखी सव्वा वर्षात ती वीस फुटांपर्यंतच वाढतील. त्यानंतर स्थानिक पर्यावरणाला पोषक अशीच झाडे जगतील. त्यानंतर या जंगलाच्या कृत्रिम देखभालीची गरज नसेल. एक शाश्‍वत असे जंगल तयार होईल. 
- डॉ. हर्षद दिवेकर, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In eight months the "Miyawaki" forest caught the baby