बस्तवडे स्फोट प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल 

रवींद्र माने
Wednesday, 9 December 2020

बस्तवडे (ता. तासगाव, जि. सांगली ) येथे जमीन सपाटीकरण करत असताना झालेल्या स्फोट प्रकरणी आठ जणांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तासगाव : बस्तवडे (ता. तासगाव, जि. सांगली ) येथे जमीन सपाटीकरण करत असताना झालेल्या स्फोट प्रकरणी आठ जणांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन मालकासह ठेकेदार आणि दोन्ही मृतांचा त्यामध्ये समावेश आहे. बेकायदा उतखनन आणि बेकायदा स्फोटकांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बस्तवडे ता. तासगाव येथे रविवारी दुपारी तीन वाजता ग.नं.377 मध्ये जमीन सपाटीकरण करत असताना टेकडी फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या स्फोटकांचा भीषण स्फोट होऊन दोन ठार, तर दोन जखमी झाले होते. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

या जमिनीचे मालक संभाजी सदाशिव चव्हाण, त्यांची पत्नी मनीषा संभाजी चव्हाण व त्यांची दोन मुले रा. सिद्धेवाडी ता. तासगाव, जमीन सपाटीकरण करण्याचे कंत्राट सांगली येथील शिवशक्ती कन्स्ट्रक्‍शनचे मोहन कल्लाप्पा जंगम रा. सांगली यांनी घेतले होते. ठेकेदार जंगम याने नागज येथील प्रतीक मन्मथ स्वामी याला ब्लास्टिंगचे काम दिले होते.

प्रतीक यांच्याकडे ब्लास्टिंगचा परवाना नसताना बेकायदा ब्लास्टिंग केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. शिवाय हे संपूर्ण काम कोणत्याही परवानग्या न घेता सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जमीन मालक संभाजी चव्हाण त्यांची पत्नी मनीषा चव्हाण त्यांची दोन मुले, ठेकेदार मोहन जंगम, मृत प्रतीक स्वामी आणि मृत ईश्वर गोरख बामणे आणि महेश शिवाप्पा दुडणावर या आठ जणांवर ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्याद सपोनि नितीन केराम यांनी दिली असून या आठ जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि बेकायदा स्फोटकांचा वापर करणे अशा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight persons have been booked in the Bastawade blast case