आज फैसला : जिल्ह्यातील 108 गाव कारभाऱ्यांची आज निवड

विष्णू मोहिते
Tuesday, 9 February 2021

सांगली जिल्ह्यातील 108 गावांतील सरपंच, उपसपंचांची निवड आज (ता. 9) होतील.

सांगली ः जिल्ह्यातील 108 गावांतील सरपंच, उपसपंचांची निवड आज (ता. 9) होतील. जत तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडींना उच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली होती. तर पलूस तालुक्‍यातील 15 गावच्या सरपंच, उपसरपंच निवडीलाही आज स्थगिती मिळाली. त्यामुळे येथील निवडी लांबणीवर पडल्या.

आरक्षित राखीव जागांवर सरपंचपदाचे इच्छुक स्पर्धक कमी तर खुल्या आणि महिलांसाठी राखीव जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे. इच्छुकांची मोर्चेबांधणी, विरोधी गटातील सदस्यांशी संपर्क, फोडाफोडीच्या घटनांमुळे स्थानिक नेत्यांची कसोटी लागली आहे.

राज्यातील साडेचौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. सरपंच पदासाठी गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील 699 गावांसाठी आरक्षण काढले. यामध्ये 209 गावांतील सरपंचद खुले राहिले. खुल्या प्रवर्गातील 423 गावांपैकी 214 गावांत महिला सरपंच असतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 189 ग्रामपंचायतींपैकी 98 गावांत महिला सरपंच तर अनुसूचित जातीच्या 83 ग्रामपंचायतीपैकी 44 गावांत महिला सरपंच असणार आहेत. अनुसूचित जमातीच्या चार पैकी दोन गावात महिला सरपंच असतील. 

गेल्या महिन्यात झालेल्या 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक 34 ग्रामपंचायती भाजप कार्यकर्त्यांचा झेंडा फडकवला. कॉंग्रेस 33, राष्ट्रवादी 29, शिवसेना 17 तर इतर स्थानिक आघाड्यांनी 39 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीकडे एकत्रित 79 ग्रामपंचायतींत सत्ता आहे. जत व पलूस तालुक्‍यांतील 54 ग्रामपंचायतींच्या निवडींना उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने उद्या केवळ 108 गावांच्या सरपंच, उपसरपंच निवडी होतील. 

खुल्या आणि महिलांसाठी राखीव जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न स्थानिक नेत्यांचे सुरू झाले आहेत. इच्छुकांची मोर्चेबांधणी, विरोधी गटातील सदस्यांशी संपर्क, तोडफोडीच्या घटनांमुळे शेवटाचा दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of 108 village Sarpanc, Vice sarpanch in the district today