
ज्यातील सहकारी संस्थांच्या स्थगित निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती,
सांगली : राज्यातील सहकारी संस्थांच्या स्थगित निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती, तेथून ती सुरू होईल. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जत अर्बन आणि पलूस सहकारी बॅंकेसह 72 संस्थांच्या निवडणुका होतील. 15 फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे संचालन, पर्यवेक्षण व नियंत्रणाची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणवर आहे. राज्यात 18 मार्च, 17 जून, 28 सप्टेंबरला कोविडच्या संकटामुळे तीन-तीन महिन्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 31 डिसेंबरला कालावधी संपला. त्यानंतर 12 जानेवारीला निवडणुका घेण्याचे आदेश दिले. पुन्हा 16 जानेवारीला 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर दोन फेब्रुवारीला परत एकदा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांचा सहा टप्प्यांचा जिल्हा निवडणूक आराखडा तयार केला आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जत अर्बन बॅंक आणि पलूस सहकारी बॅंकेसह 72 संस्थांच्या निवडणुका होतील. दोन बॅंका वगळता उर्वरीत 70 संस्था या विकास सोसायटीच आहेत. ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित झाल्या होत्या, तेथून प्रक्रिया सुरू होईल. त्यानुसार 15 फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमाप्रमाणे सुरू होईल. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. दुसऱ्या ते सहाव्या टप्प्यातील निवडणुकीस पात्र संस्थांचा कार्यक्रम नंतर घोषित केला जाणार आहे.
जिल्ह्यात जत अर्बन बॅंक, पलूस सहकारी बॅंकेसह आटपाडी तालुका- 9 विकास सोसायटी, खानापूर तालुका- 2 सोसायटी, जत तालुका- 6 सोसायटी, कडेगाव तालुका- 8 सोसायटी, तासगाव तालुका- दोन सोसायटी, कवठेमहांकाळ तालुका- 5 सोसायटी, वाळवा तालुका- 8 सोसायटी, पलूस तालुका- 7 सोसायटी, मिरज तालुका- 11 सोसायटी, शिराळा तालुका- 12 सोसायटी यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
तीन कारखान्यांची ठराव प्रक्रिया
जिल्ह्यातील विश्वास कारखाना, मोहनराव शिंदे कारखाना, सोनहिरा कारखाना यांच्या निवडणुकीसाठी ब वर्ग संस्था प्रतिनिधीचे ठराव संकलन प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
संपादन : युवराज यादव