निवडणूक प्रशासनाचा क्रीडा संकुलाला ठेंगा ; साडेपाच लाख रुपये थकीत

सिद्धार्थ लाटकर
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

जिल्हा क्रीडा संकुल समितीस माहिती अधिकारात माहिती मागविल्यानंतर थकीत रक्कम झाली उघड.

सातारा ः जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांसाठी निवडणूक प्रशासनाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर केला जातो. परंतु, त्यापोटी प्रशासनाने आजवर संकुलास एक रुपयादेखील शुल्क अदा केले नसल्याची माहिती मिळाली आहे. सन 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे तीन लाख 34 हजार, तसेच सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठीचे दोन लाख 19 हजार रुपये असे एकूण पाच लाख 53 हजार रुपये प्रशासनाकडून संकुलाला येणे आहे. 

खेळ आणि खेळाडूंसाठी असलेले छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यास देऊ नये, अशी भूमिका जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक, शाळा, महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्था सातत्याने जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे मांडत आले आहेत. तरीही प्रशासन हे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांसह खेळाडूंच्या निवासासाठी असलेल्या खोल्या ताब्यात घेते. तेथेच निवडणुकीचे कामकाज केले जाते. यामुळे खेळाडूंचा दैनंदिन सराव थांबतो. परिणामी खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे क्रीडा स्पर्धांत जिल्ह्याची कामगिरी सरस ठरत नाही, अशी तक्रार क्रीडा शिक्षक आणि खेळाडूंची आहे.
 
दरम्यान, "सकाळ' च्या प्रसतुत प्रतिनिधीने जिल्हा क्रीडा संकुल समितीस माहिती अधिकारात माहिती मागवली. त्यामध्ये सन 2014 आणि सन 2019 मधील निवडणुकांसाठी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील कोणत्या सुविधांचा वापर झाला. त्यासाठी किती रुपये शुल्क आकारले, किती शुल्क जमा झाले तसेच थकीत रकमेची माहिती घेतली. त्यानुसार आत्तापर्यंत प्रशासनाकडे क्रीडा संकुलाचे पाच लाख 53 हजार रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सन 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी सप्टेंबर 2014 ते ऑक्‍टोबर 2016 या कालावधीमध्ये क्रीडा संकुलाचा वापर करण्यात आला. त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी बहुद्देशीय हॉल (जुने आणि नवीन बॅडमिंटन कोर्ट) 20 दिवसांसाठी, स्ट्रॉंगरूमकरिता तीन खोल्यांचा 26 महिने वापर करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने तीन लाख 34 हजार रुपयांची आकारणी केली आहे. मात्र, प्रशासनाने पाच वर्षांत आजवर एक रुपयाही भरलेला नाही. सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठी मार्च-एप्रिल या कालावधीमध्ये क्रीडा संकुलातील जुना बॅडमिंटन हॉल, खेळाडूंच्या निवासासाठी असलेल्या चार खोल्या तसेच मुख्य मैदानाचा वापर करण्यात आला. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने दोन लाख 19 हजार रुपयांची आकारणी केली आहे. हे शुल्कदेखील अद्याप क्रीडा संकुल समितीकडे जमा झालेले नाही. जिल्हा क्रीडा संकुल समितीने या थकीत रकमेबाबत प्रशासनास कळविल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Administration yet to pay five lakhs rupees to sports complex committee