सोलापूर: पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी शिकवला धडा | Election Results 2019

तात्या लांडगे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Results 2019 : विधानसभा निवडणूकीपूर्वी दिलीप माने, दिलीप सोपल, रश्‍मी बागल, उत्तमराव जानकर, नागनाथ क्षिरसागर यांनी पक्ष बदलले मात्र जनतेने त्यांना  धडा शिकवत पराभव दाखवून दिला.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामीचा अंदाज घेऊन विधानसभा निवडणुकीत आपल्याला आमदारकीची संधी मिळेल या आशेने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले. मात्र, मतदारांनी दिलीप माने, दिलीप सोपल, रश्‍मी बागल, उत्तमराव जानकर, नागनाथ क्षिरसागर यांना धडा शिकवत पराभव दाखवून दिला.

वर्षानुवर्षे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सत्तेत स्थान मिळवूनही कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गजांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल, कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीच्या नेत्या रश्‍मी बागल, भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले उत्तमराव जानकर, नागनाथ क्षिरसागर यांना महायुतीच्या सत्तेत आपला विजय साकार होईल, असा विश्‍वास होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपला दुसऱ्यांना मिळालेल्या स्पष्ट बहूमताचा अंदाज घेत या नेत्यांनी पक्षांतर केले. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शरद पवार यांनी सभा घेतल्या मात्र, त्यांना यश मिळालेच नाही.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ
बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीला बगल देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ याची प्रचिती करमाळा विधानसभा मतदारसंघात आली. शिवसेनेने नाकारलेला विद्यमान आमदार नारायण पाटील व राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या रश्‍मी बागलांना मिळालेली उमेवारी आणि त्यांच्यातील चुरस याचा लाभ उठवत संजय शिंदे यांनी विजय साकारला. तत्पूर्वी, संजय शिंदे यांनी माढा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढवली होती. अखेरच्या क्षणी शिंदे यांनी नारायण पाटील यांच्यावर मात करीत पाच हजारांच्या मताधिक्‍याने विजय मिळवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur result evening