तासगावात वाजू लागले निवडणुकीचे पडघम; सत्ताधारी - विरोधकांची कसोटी

रवींद्र माने
Wednesday, 6 January 2021

तासगाव नगरपालिकेतील भाजपच्या एकहाती सत्तेला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. निवडणुकीचे डिंडीम ऐकू येत आहेत.

तासगाव  (जि. सांगली) : तासगाव नगरपालिकेतील भाजपच्या एकहाती सत्तेला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. निवडणुकीचे डिंडीम ऐकू येत आहेत. राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागलेत. शिल्लक आठ महिन्यांत सत्ताधारी, विरोधकांनाही तासगावकरांसमोर काय कमावले? काय गमावले? याचा लेखाजोखा मांडावा लागेल.

पालिकेवर एकहाती भाजपचा झेंडा फडकून बघता बघता चार वर्षे पूर्ण झाली. या चार वर्षांत पुलाखालून खूप पाणी गेले. भाजपने सत्तेवर येत असताना आणि आल्यावर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले का? दिलेली किती आश्वासने पाळली गेली? किती विकासकामे झाली? याचा आता लेखाजोखा मांडावा लागणार आहे.

त्याचवेळी विरोधक म्हणून विरोधकांनीही शहराच्या विकासात काय भूमिका बजावली, हेही जनतेसमोर ठेवावे लागणार आहे. चार वर्षांत केलेल्या कामाच्या प्रगतिपुस्तकावर तासगावकर काय शेरा मारतात, हे पाहावे लागणार आहे. आपल्याला चांगला शेरा मिळावा यासाठी शिल्लक सात-आठ महिन्यांत धडपडावे लागणार आहे.

डिसेंबर 2021 मध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध आतापासून लागले आहेत. त्याची चाहूल सुरू झालेल्या राजकीय हालचालीमधून लागू लागली आहेत. तशा बैठका आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या तासगाव शहरातील राजकीय पदाधिकारी निवडीतून या निवडणुकीचे संकेत मिळू लागले आहेत.

याशिवाय येत्या निवडणुकीत प्रभागाऐवजी वॉर्डरचना होऊन नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने, आतापासून इच्छुक मतदारसंघ बांधणीच्या मार्गाला लागले आहेत. निवडणुकीला अजून आठ-दहा महिने शिल्लक असले तरी गेल्या वेळी संधी हुकलेल्या चेहऱ्यांची राजकीय पक्ष कार्यालयात वाढती ऊठबस पाहता पालिका निवडणुकीचे डिंडीम वाजू लागल्याचे ऐकू येत आहे. 

हे प्रश्‍न अनुत्तरित 
चोवीस तास मीटरसह पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, कापूर ओढ्यात वाहून गेलेले 60 कोटी, बाह्य वळण रस्ता, रेंगाळलेले पालिकेच्या नव्या इमारतीचे काम, नगरसेवकांची ठेकेदारी, या काळातील अनेक कामांची सुरू असलेली चौकशी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या तिजोरीत झालेला खडखडाट, या प्रश्नांची उत्तरे गेल्या चार वर्षांत मिळालेली नाहीत. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election in Tasgaon;test of Ruling & opposition