सांगलीत नविन वर्षात 2200 हून अधिक संस्थांच्या निवडणुका

घनशाम नवाथे 
Friday, 11 December 2020

नविन वर्षात निवडणुका जाहीर झाल्यास आगामी वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणूनच पार पडेल. त्यामध्ये जिल्हा सहकारी बॅंक, प्राथमिक शिक्षक बॅंक, सॅलरी अर्नर्स सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी निवडणुका लक्षवेधी ठरतील. 

सांगली : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील नविन वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन केले जाईल असे नुकतेच जाहीर केले. त्यामुळे मावळत्या वर्षात मुदत संपलेल्या 1279 सहकारी संस्था आणि नविन वर्षात मुदत संपणाऱ्या 973 सहकारी संस्था अशा 2252 संस्थांच्या निवडणुका होतील. त्यामुळे नविन वर्षात निवडणुका जाहीर झाल्यास आगामी वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणूनच पार पडेल. त्यामध्ये जिल्हा सहकारी बॅंक, प्राथमिक शिक्षक बॅंक, सॅलरी अर्नर्स सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी निवडणुका लक्षवेधी ठरतील. 

जिल्ह्यात 2020 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार होते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून त्याची तयारी सुरू होती. जवळपास 1200 हून अधिक संस्थांच्या 2020 मध्ये निवडणुका होणार हे निश्‍चित होते. परंतू मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. त्यामुळे लॉकडाउनची प्रक्रिया सुरू झाली. मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो अजूनही कायम आहे.

त्यामुळे या वर्षभरात मुदत संपणाऱ्या संस्था, बॅंकांच्या निवडणुकांना स्थगिती दिली गेली. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढीचा बोनस मिळाला. कोरोनाच्या काळात सहकारी संस्था किंवा बॅंकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. नुकतेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक झाली. त्यामुळे आता इतर संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. 

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतेच नविन वर्षात टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नविन वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून चर्चेत राहिल अशी परिस्थिती आहे. कारण मावळत्या वर्षात मुदत संपलेल्या 1279 सहकारी संस्थांच्या निवडणुका नविन वर्षात कोरोनाची परिस्थिती पाहून घ्याव्या लागतील. तसेच नविन वर्षात देखील 973 सहकारी संस्थांचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे मावळत्या वर्षातील आणि नविन वर्षातील मुदत संपणाऱ्या अशा एकुण 2252 संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. कदाचित या निवडणुकांमध्येच नविन वर्ष संपून जाईल अशी परिस्थिती आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, प्राथमिक शिक्षक बॅंक, सॅलरी अर्नर्स सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समितीसह काही सहकारी बॅंका, कारखाने यांच्या निवडणुका नविन वर्षात होतील. त्यामुळे या महत्वाच्या संस्था ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्ष व नेतेमंडळींचा कस लागणार आहे. तशातच अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांचे वर्ष म्हणून 2021 वर्ष कदाचित ओळखले जाईल. 

जिल्हाभर निवडणुकांचे वारे- 
डिसेंबर अखेर अ, ब, क आणि ड वर्गातील 1279 संस्थांची मुदत संपलेली आहे. त्यामध्ये अ वर्गातील दोन संस्था, ब वर्गातील 545 संस्था, क वर्गातील 482 संस्था आणि ड वर्गातील 250 संस्थांचा समावेश आहे. सर्वच तालुक्‍यात या संस्था विभागल्या आहेत. तसेच नविन वर्षात सर्वच तालुक्‍यातील मिळून 973 संस्थांची मुदत संपणार आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections of more than 2200 organizations in Sangli New Year