सांगली : आकडेबहाद्दरांवर कारवाईचा फार्सच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Power theft case Sangli

सांगली : आकडेबहाद्दरांवर कारवाईचा फार्सच

सांगली : राज्यातील वीजटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर वीज चोरणाऱ्या आकडेबहाद्दरांना चाप लावण्याचे आदेश ‘महावितरण’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील २१२ आकडेबहाद्दरांवर आठवड्यापूर्वी कारवाई झाली. जिल्ह्यात आकडेबहाद्दर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आकडेबहाद्दरांना शोधून कारवाईची हीच योग्य वेळ आहे. शेतीसाठी दिलेल्या विजेच्या गळतीच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांचा केवळ कारवाईचा देखावा करून वेळकाढूपणा सुरू आहे. प्रत्यक्षात सर्वांच्या साक्षीनेच आकडेबहाद्दर मोकाट आहेत.

वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांवरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबवण्याचे आदेश दिलेत. रोहित्रांवर वीज चोरी आढळल्यास संबंधित ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशानंतरही जिल्ह्यात कारवाईचा केवळ दिखाऊपणा सुरू असल्याचे चित्र आहे. एखाद्या कारवाईचा डंका आणि पुन्हा महिनाभर कारवाईत सातत्य राखले जात नाही. वीज गळतीस जबाबदार असलेल्या आकडेबहाद्दरांवर कारवाईपेक्षा त्यांना अभय देण्यासाठीच काही अधिकारी-कर्मचारी काम करतात का, असे वाटावे अशी स्थिती आहे.

चोरांवर गुन्हे नोंदवा...

सर्व रोहित्रांची विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. ग्राहकांनी वीज चोरी केली असल्यास नियमानुसार कारवाई करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांच्यावर अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश आहेत. यामुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. गुन्हा सिद्ध झाला तर कारावासही होऊ शकतो.

‘सकाळ’ने वेधले लक्ष

जिल्ह्यातील आकडेबहाद्दरांबद्दल ‘सकाळ’ने सातत्याने लक्ष वेधले आहे. जिल्ह्यात ६० हजारांहून अधिक आकडेबहाद्दर आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली तर भारनियमन करावेच लागणार नाही. अधिकारी-कर्मचारी यांच्या पाठबळावरच हे सुरू आहे. शेतकरी त्यांची किंमत मोजून आकडे टाकतात, हे सर्वश्रुत आहे. धडक कारवाईने नियमित ग्राहकांना दिलाशाची अपेक्षा आहे.

महावितरणकडून आकडे टाकून वीज चोरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. ती आणखी कडक करू. पूर्वभागात आकड्यांचे प्रमाण जास्त आहे. गतवर्षी नव्याने १२ हजार कृषिपंपांना नव्याने जोडण्या दिल्या. सध्या चार हजार ५०० अर्ज बाकी आहेत. त्यांना वीजचोरीसाठी परवाना दिला, असे नाही. अशांवरही कारवाई होईल. कृषिपंपांची गळती आहे, त्यात सुधारणा करू.

- धर्मराज पेठकर,अधीक्षक अभियंता, ‘महावितरण’

शेतकऱ्यांची बिले दुरुस्त करा, कार्यक्षमता वाढवा, नुकसान कमी करा, अशी मागणी दहा वर्षांपासून आहे. नुकसान कमी होत नाही, तोवर महावितरण नफ्यात येणार नाही. महावितरण गळती लपवत आहे. त्यात भ्रष्टाचार आहे. ज्या विभागात चोरी, भ्रष्टाचार होत असेल, ती कंपनी दिवाळखोरीत निघणार, हे निश्‍चित.

- प्रताप होगाडे, माजी आमदार

अनामत भरली म्हणून आकडा...

ग्रामीण भागात अनेक शेतकरी उन्हाळ्यात कूपनलिका घेतात. आकडे टाकून किंवा दुसऱ्यांच्या पेटीतून ५००-१००० फुटांवरून वीजपुरवठा सुरू केला जातो. चार-पाच वर्षे वापरानंतर अनामत भरली जाते. कर्मचारी, अधिकाऱ्यांसमोर असे शेतकरी राजरोसपणे आकडा टाकून वीजचोरी करतात.

Web Title: Electricity Power Theft Case Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top