सांगलीत मारुती रोड, कापडपेठेत अतिक्रमण निर्मुलन...दुकानांची शेड काढली

बलराज पवार
Wednesday, 30 September 2020

सांगली-  शहरातील दत्त मारुती रोड ते बालाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दुकानांची अतिक्रमण करणारी शेड आज महापालिकेने हटवली. मिरजेत काही दिवसांपुर्वी महापालिकेने अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवली होती. त्यापाठोपाठ आज सांगलीतही अतिक्रमण विभागाने बडगा उगारला. 

सांगली-  शहरातील दत्त मारुती रोड ते बालाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दुकानांची अतिक्रमण करणारी शेड आज महापालिकेने हटवली. मिरजेत काही दिवसांपुर्वी महापालिकेने अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवली होती. त्यापाठोपाठ आज सांगलीतही अतिक्रमण विभागाने बडगा उगारला. 

दत्त मारुती रोड ते बालाजी चौक, कापडपेठ या रस्त्यावर दुकानदारांनी शेड मारुन तेथे व्यवसाय सुरु केला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. गणेशोत्सव काळात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच सणासुदीचा हंगामही आता सुरु होत असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावर गर्दी होवू नये या दृष्टीने ही अतिक्रमणे काढणे गरजेचे होते. 

आयुक्त नितीन कापडणीस यांनी याची दखल घेऊन ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे आज कारवाई केली. आज सकाळी लवकरच अतिक्रमण विभागाचे पथक बाजारपेठेत दाखल झाले. शहरातील बालाजी चौक ते मारुती रोडवरील दुकानांची शेड काढण्याचे काम सुरु केले. उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, गणेश माळी, वैभव कुदळे, किशोर कांबळे, अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्या पथकाने सहभाग घेतला होता. 

या कारवाईमध्ये वाढीव शेडबरोबरच रस्त्यावरील बोर्ड, दुकानासमोरील लोखंडी रॅकसुद्धा जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात साहित्यही ताब्यात घेण्यात आले. शहर अतिक्रमण मुक्त करण्याची ही मोहीम सुरू राहणार असून व्यापारी आणि फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करू नये, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elimination of encroachment in Sangli Maruti Road