Vidhan Sabha 2019 उमेदवारांकडून विकासाची स्वप्ने दाखविण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. यामध्ये पाणी, औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.

सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे मुद्दे बदलत असले तरी जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेऊन यावेळेस प्रथमच सर्वच उमेदवार मुद्दे मांडत आहेत. 

निवडणुका म्हटले की सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा पाहायला मिळतो. सध्या विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यावर भर दिलेला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रचारात वैयक्तिक आणि पक्षीय पातळीवरील टीकेसोबत मतदारसंघाच्या विकासासाठीच्या मुद्यांवरही सर्वच उमेदवारांनी भर दिला आहे. मतदारसंघनिहाय विकासाचे मुद्दे बदलत असले तरी जिल्ह्याचा विकासाला सर्वांचे प्राधान्य असल्याचे चित्र आहे. 

मेडिकल कॉलेज 

साताऱ्यात उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या प्रचारात बोंडारवाडी धरण, मेडिकल कॉलेज, स्मार्ट सिटी आणि जावळी, साताऱ्याच्या विकासाच्या मुद्यांना प्राधान्य दिले आहे. सत्तेसोबत राहून मतदारसंघांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे दोन्ही राजे सांगताना दिसत आहेत. 

नवीन महाबळेश्‍वर 

वाई मतदारसंघात मकरंद पाटील, मदन भोसले आणि पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचारात रंगत आणली आहे. येथे प्रचारात कवठे-केंजळ योजना, नागेवाडी प्रकल्पाचे अपूर्ण कालवे, महाबळेश्‍वर आणि पाचगणीतील पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकास, एक महाबळेश्‍वर असताना दुसरे नवीन महाबळेश्‍वर कशाला हवे, असा प्रश्‍न उपस्थित करून, आहे या महाबळेश्‍वरचा विकास करून पर्यटनवाढीला चालना देण्यावर भर देण्याचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. 

वसना-वांगणा 

कोरेगावात शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांनी आपल्या प्रचारात वसना-वांगणा प्रकल्प, कोरेगावातील रेल्वेचा प्रश्‍न, सिंचन प्रकल्प आणि औद्योगिक वसाहत आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्‍नांवर भर दिल्याचे दिसत आहे. 

हणबरवाडी योजना 

कऱ्हाड उत्तरेत बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. येथे ऊसदराचा प्रश्‍न कळीचा मुद्दा ठरणार आहे. हणबरवाडी पाणी योजना, औद्योगिक विकास, बेरोजगारी हे मुद्दे प्रचारात येत आहेत. 

कऱ्हाड स्मार्ट सिटी 

कऱ्हाड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील यांच्यात तिरंगी सामना होत आहे. प्रत्येक गावात येथील प्रत्येक नेत्याने विकासाची गंगा कशी जनतेपर्यंत पोचवली, या मुद्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. यासोबतच कऱ्हाड व मलकापूरचा विकास, स्मार्ट सिटी, औद्योगिक विकास, बेरोजगारीच्या प्रश्‍नाला येथे प्रचारात स्थान दिले जात आहे. 

औद्योगिक विकास 

पाटणला पारंपरिक लढतीत शूंभराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी लढत होत असताना प्रचारात शंभूराज देसाईंनी सत्तेत असताना केलेली कोट्यवधींची कामे जनतेपुढे मांडली जात आहेत. तसेच विरोधकांकडून सत्तेत असूनही पाटणच्या दुर्गम भाग विकासापासून कसा वंचित राहिला, हे मांडले जात आहे. या सोबतच औद्योगिक विकास, ऊसदर आणि रोजगाराचा मुद्दाही प्रचारात आहे. 

पाण्याचा प्रश्‍न 

माण तालुक्‍यात जयकुमार गोरे, शेखर गोरे, तिसऱ्या आघाडीतील अनिल देसाई, राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे रणजित देशमुख आदी लढत आहेत. पण, येथे एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना माण-खटावचा पाणी प्रश्‍न कसा सोडविला, टॅंकर मुक्तीकडे माणची कशा पध्दतीने वाटचाल सुरू आहे, या मुद्यांभोवती प्रचार सर्वाधिक फिरत आहे. तसेच औद्योगिक विकास, रोजगाराच्या मुद्यांचाही समावेश आहे. 

रेल्वेचा प्रश्‍न 

फलटणला दीपक चव्हाण, दिगंबर आगवणे यांच्यातच प्रामुख्याने लढत होत असली तरी येथे फलटणचे राजे विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अशी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे येथील प्रचारात बारामतीला पाणी कसे गेले, उद्योगधंदे वाढीसाठी कसा प्रयत्न होणार, रेल्वेचा प्रश्‍न, युवकांच्या हाताला काम देण्यासोबतच मतदारसंघातील विकासाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मुद्यांना उमेदवारांनी प्रचारात भर दिला आहे. वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या टीकेसोबत पाणीप्रश्‍नाचा मुद्दा या मतदारसंघात कळीचा ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on dreaming of development by candidates; Water, industrial development preferred