साहेब बिल कधी येईल ? त्या महिलेची आर्त विनवणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

वाळवा तालुक्‍यात बिलासाठी परवड, कारखाना कार्यालय कर्मचाऱ्यांची चालढकल    

कुरळप : साहेब बिल कधी येईल.... परवा सांगितले की तुम्हाला....अजून यायला वेळ लागेल....किती वेळ लागेल का दिवाळीलाच येईल....नाही नाही आठ दिवसांत येईल...अहो नक्की सांगा कधी येईल, पैसे नाहीत.... मी तुमचा फोन नंबर घेतला, बिल आले की कळवितो... हा सरकारी पठडीतील संवाद आहे कुरळप येथील ऊस उत्पादक वृद्ध महिला व कारखाना कार्यालय कर्मचारी यांच्यातील. 

आज तरी बिलासंबंधी कानावर काहीतरी सुखद ऐकायला मिळेल, अशी इच्छा ठेवून आलेल्या वृद्धेला परत पदरात काहीच न पडता माघारी फिरावे लागले. अजून किती दिवस तिला काठी टेकत कारखानदार चकरा मारायला लावतात ही लाजिरवाणी बाब आहे. चालता येत नसूनही काठीचा आधार घेऊन ऊस शेती करणाऱ्या वृद्ध स्त्रीला अठरा महिने कष्ट घेऊन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या उसाच्या बिलाची आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे?

हेही वाचा - काँग्रेसच्या आणखी एका आमदारांना कोरोनाची लागण..

ऊस कारखान्याला जाउन  सात महिने झाले, दुसऱ्या गळीताचा हंगाम जवळ आला तरी पूर्वी गेलेल्या हंगामातील उसाची बिलातील दमडीही कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. ऊस उत्पादक शेतकरी कारखाना कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत. मात्र त्यांना तारखांन शिवाय हाती काहीही लागत नाही. पुढच्या आठवड्यात येईल, येत्या सोमवारी येईल, बारा तारखेला येईल, एक तारखेला येईल, असे एक ना तर अनेक दिवसांपासून, तब्बल सात महिन्यांपासून शेतकरी तारीख पे तारीख ऐकत आहेत.

यंदा  वारणा पट्यातील कारखान्यांचे काही खरे नाही असे सुरवातीला चित्र निर्माण झाले होते. यामुळे अनेकांनी नोंद असूनही आपला ऊस दुसरीकडे घातला, मात्र आपल्याकडे ऊस येत नाही हे लक्षात येताच कारखानदारांनी शेतकऱ्यांना मोहित करण्यासाठी सुरवातीला आलेल्या उसाची बिले त्वरित दिली. यामुळे शेतकऱ्यांनी  आता कारखाना नीट सुरू झाला आहे अशा आविर्भात  पुन्हा एकदा त्याच कारखान्यावर विश्वास दाखवत आपला ऊस पाठविला. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आहे. 

हेही वाचा -  ते साठजण लढले आणि जिंकले सुध्दा !... पोलीस योद्धे पुन्हा सेवेत रुजु...

आज ना उद्या बिल येईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी पै-पाहुणे, मित्र मंडळी यांचे कडून पैसे घेतले आहेत. बॅंक, पतसंस्था, सावकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजले आहेतच. सध्या बारावी, दहावी बोर्डाचे निकाल लागले आहेत. आपल्या पाल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी शिक्षणाला पाठवण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. पैसे नसल्याने त्यांचीही गलितगात्र अवस्था होत आहे. संबंधित पैसे न दिलेल्या कारखानदारांनी ताबडतोब ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अशी मागणी होत आहे.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the employees of sugar factory ignores people the topic of sugarcane bill in sangli